Latest Marathi News
Ganesh J GIF

खारघर दुर्घटनेतील मृत्यूप्रकरणी धक्कादायक अहवाल समोर

पोस्ट मॉर्टम अहवालात धक्कादायक खुलासा, श्री सेवकांच्या मृत्यूने सरकार अडचणीत

मुंबई दि २०(प्रतिनिधी)- खारघर येथील महाराष्ट्र भूषण पुरस्कार कार्यक्रमात उष्माघाताच्या झटक्याने १४ जणांचा बळी गेला. या दुर्घटनेमुळे राज्य सरकारवर संतप्त टीका होत असतानाच आता या मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांचा पोस्ट मॉर्टम अहवाल आला आहे. या अहवालात अनेक धक्कादायक बाबींचा खुलासा करण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा रणकंदन होण्याची शक्यता आहे.

या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या १४ पैकी १२ जणांनी सहा ते सात तासांपासून काहीच खाल्लेले नव्हते, असे या अहवालात म्हटले आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी कडक ऊन आणि गर्मी असलयामुळे मृतांच्या शरीरात पाण्याचा थेंबही नव्हता असं स्पष्ट झालं आहे. या मृतांपैकी काही जण आधीच आजाराने त्रस्त होते, त्यातच डोक्यावर कडक ऊन आणि पोटात काही नसल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये समोर आली आहे. विशेष म्हणजे, हा कार्यक्रम ज्या ठिकाणी होता तेथे आदल्या दिवशी काही अधिकारी पाहणी करण्यासाठी गेले होते त्यावेळी त्यांनाही उन्हाचा त्रास झाला होता. मात्र, त्यांनी ही गोष्ट वरिष्ठांच्या कानावर घातली नाही असे आता समोर येत आहे. दरम्यान या दुर्घटनेनंतर आता राज्य सरकारला उपरती झाली असून सरकारने काही महत्वाचे निर्देश दिले आहेत. शासनाने दुपारी १२ ते सायंकाळी ५ या वेळेत खुल्या जागेत कोणतेही कार्यक्रम आयोजित करू नयेत, असे राज्य सरकारने म्हटले आहे.

ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना प्रदान करण्यात आला. हा सोहळा पाहण्यासाठी जवळपास २० लाख श्रीसदस्य उपस्थित होते यातील १४ जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला होता.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!