Latest Marathi News
Ganesh J GIF

पुणेकरांना मिळकतकरातून मिळणार ४० टक्के कर सवलत

मंत्रिमंडळाची पुणेकरांना गुड न्यूज, शास्तीकरावरून मात्र नाराजी

पुणे दि २०(प्रतिनिधी)- पुणे शहरातील नागरिकांना मंत्रिमंडळाने एक गोड बातमी दिली आहे. पुणेकरांच्या बजेटमध्ये वर्षभरात ४० टक्के रकमेची बचत होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे १७ मार्चच्या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.

पुणे महापालिकेमार्फत स्वतःच्या मालकीच्या घरात राहत असल्यास घरपट्टीमध्ये ४० टक्के सवलत यापुर्वी मिळत होती. ही सवलत पुन्हा सुरू करण्याबाबत पुणेकर नागरिकांची असलेली अनेक वर्षांपासुनची मागणी अखेर मान्य करण्यात आली आहे. पुण्याचे पालकमंत्री व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. या निर्णयामुळे पुणेकरांचा फायदा होणार आहे. तसेच यापूर्वी ज्यांनी कर भरला आहे, त्याची रक्कम आगामी बिलातून कमी करण्याचा निर्णय झाला आहे. महानगरपालिकेच्या हद्दीतील मालमत्ता कर आकारणी करतांना वार्षिक भाड्यातून आता १५% सवलत मिळणार आहे. यापूर्वी ही सवलत १०% होती. परंतु मालमत्ताधारक स्वत: राहण्यासाठी वापर असल्यास त्यांना वार्षीक मालमत्ता करपात्र रक्कम निश्चित करतांना ४०% सवलत देण्यास शासनाने मान्यता दिली आहे. तसेच दि.३१ मार्च २०२३ पर्यंतच्या फरकाच्या रकमेची वसुली माफ करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे.सन २०१९ – २३ या कालावधीत ज्यांनी मालमत्ता कर भरणा केला आहे. त्यांच्या फरकाची रक्कम पुढील देयकामधून वळती करण्यात येणार आहे. यामुळे ४०% सवलतीचा लाभ घेतलेल्या अंदाजे ५.४ लाखांपेक्षा अधिक मालमत्ताधारकांकडुन सुमारे रु.४०१ कोटीहुन अधिक व १५% वजावटीचा लाभ घेतलेल्या अंदाजे ८.८२ लाख मालमत्ता धारकांकडुन सुमारे १४१.०८७ कोटी इतकी फरकाची रक्कम वसुलीची कारवाई करणे आवश्यक होते. अशाप्रकारे मोठ्या प्रमाणात असलेली फरकाची रक्कम पुर्वलक्षी प्रभावाने वसुल करावयाची झाल्यास मालमत्ता धारकांवर खुप मोठा बोजा पडणार होता.

शास्तीकरा बाबत कुठलाच निर्णय न झाल्याने या निर्णयाकडे डोळे लावून बसलेल्या नागरिकांची तसेच व्यावसायीकांची निराशा झाली आहे. पुणे महापालिकेच्या हद्दीमध्ये मागील अनेकवर्षामध्ये बेकायदा बांधकामे झाली आहेत. महापालिकेने अशा बांधकामांचा शोध घेउन संबधित बांधकामांची तीनपट कर आकारणी सुरू केली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!