
सोलापूर : सोलापूर येथील डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
यामध्ये एका विद्यार्थ्याने ‘एमबीबीएस’च्या प्रथम वर्षाला शिकत असलेल्या एका विद्यार्थ्याने आसार मैदानाजवळील एका लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. आकाश संतोष जोगदंड (रा. चौसाळा, जि. बीड) असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नाव आहे.
काय घडले नेमके?
आकाश संतोष जोगदंड याने तीनवेळा परीक्षा देऊनही ‘एमबीबीएस’च्या पहिल्याच वर्गातील विषय निघत नसल्याने त्याने आत्महत्या केली असल्याचे पोलीस तपासात समोर आले. बीड जिल्ह्यातील चौसाळा येथील आकाशने २०२० मध्ये डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. त्याने आतापर्यंत तीनवेळा परीक्षा दिली, पण आकाशला प्रथम वर्षाच्या सर्व विषयांत उत्तीर्ण होता आले नव्हते. त्यामुळे तो खूप तणावात होता. यानंतर त्याने याच तणावातून पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. फौजदार चावडी पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
आकाशने आत्महत्या करण्याच्या अगोदर एक सुसाईड नोटदेखील लिहली आहे. या नोटमध्ये त्याने ‘मला डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करता आले नाही, त्याबद्दल आई-बाबांनी मला माफ करावे. मला परीक्षेतील अनुत्तीर्ण विषय काढणे शक्य होईना, त्यामुळे मी जगाचा निरोप घेतोय.आई दीदीची काळजी घे, तिला नीट सांभाळ, माझ्या मृत्यूची बातमी आई-बाबांना सांगू नका, मामाला सांगा. माझ्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नका’ असे लिहिले आहे.