Latest Marathi News
Ganesh J GIF

मुंबईत खुनाचा वेगळा पॅटर्न! आधी हत्या आणि मग मृतदेहाचे केले तुकडे

मुंबई – आधी वसतीगृहातील तरूणीच्या हत्येचे प्रकरण आणि नंतर मीरा रोडमध्ये लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या महिलेची पार्टनरने हत्या केल्यामुळे मुंबई हादरली आहे.

या हत्येप्रकरणी अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत. प्रेयसीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याबाबतही अनेक शंका व्यक्त केल्या जात आहेत. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने प्रेयसीच्या शरीराचे तुकडे शिजवून कुत्र्यांना खायला घालत असल्याचेही समजते. याशिवाय मृतदेहाचे अवयव ड्रेनेज लाईनमध्ये फेकल्याची शक्यताही पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. अशा स्थितीत पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून याबाबत नया नगर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

गीता आकाशदीप सोसायटीतील सातव्या माळ्यावर मनोज साहनी (वय ५६) आणि सरस्वती वैद्य ( वय ३२) एकत्र राहत होते. दोघेही लिव्ह इनमध्ये होते. गेल्या तीन वर्षापासून हे दोघे या सोसायटीत भाड्याने राहत होते. मात्र, दोघांचे कडाक्याचे भांडण झाल्याने मनोजने सरस्वतीची हत्या केल्याचे पोलीसांनी सांगितलं. दरम्यान, पोलिसांनी आरोपीच्या घरातील भीषण दृश्याचे वर्णन केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घराचा दरवाजा उघडताच प्रचंड दुर्गंधी येत होती. तो वास इतका भयानक होता की तिथे उभं राहणंही कठीण झाले होते. यानंतर पोलीस आत शिरताच त्यांना मानवी शरीराचे तुकडे दिसले. ते पाहून सर्वच अवाक् झाले. हॉलमध्ये त्यांना झाडं कापणारे मशीन, कटर दिसले. तर बेडरूममध्ये बेडवर काळ्या रंगाच्या पिशव्या पसरलेल्या दिसत होत्या.

बादलीत होते शवाचे तुकडे

यानंतर स्वयंपाकघराचा दरवाजा उघडला असता तेथे तीन बादल्या ठेवल्या होत्या, त्यात मृतदेहाचे तुकडे ठेवलेले दिसले. आजूबाजूला रक्त दिसत होते. याशिवाय बेडरूममध्ये मुलीचे केस पडलेले आढळून आले. मृतदेहाचा दुर्गंध पसरू नये यासाठी घरात बरेच एअर फ्रेशनर फवारलेले होते. काळजाचा थरकाप उडवणारी ही घटना पाहून पोलिसांची मतीही गुंग झाली.

मृतदेहाचे तुकडे कूकरमध्ये उकळले

मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी मनोज आणि सरस्वती यांच्यादरम्यान कोणत्या तरी कारणावरून भांडण झाले होते. प्रकरण इतके वाढले की मनोजने रागाच्या भरात सरस्वतीची हत्या केली. यानंतर त्याने तिच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि नंतर ते प्रेशर कुकरमध्ये उकळले. मात्र, हत्येमागचे खरे कारण काय होते, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.

पोलिसांना मिळाले १२ – १३ तुकडे

पोलिसांना मनोजच्या फ्लॅटमधून केवळ १२-१३ मृतदेहांचे तुकडे सापडले. मनोज हे तुकडे उकळून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी पॅकेटमध्ये भरत होता. उर्वरित काही तुकडे त्याने आधीच निकाली लावले होते. घटनास्थळी फॉरेन्सिक टीमलाही पाचारण करण्यात आलं. फ्लॅटमधील इतर पुरावेही गोळा केले आहेत. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर अधिक माहिती मिळणार आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून त्याची चौकशी सुरू आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!