….म्हणून नागरिक म्हणतात ‘ताई आमची हक्काची’
पुणे आणि दाैंड मधील प्रवाशांनी का मानले खा.सुळेंचे आभार? बघा
पुणे, दि. १९ (प्रतिनिधी) – दिल्लीहून निघालेली हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस अहमदनगर रेल्वे स्थानकावर काल तब्बल बारा तास थांबवण्यात आली होती. त्यानंतरही थेट पुण्याकडे न सोडता सोलापूर मार्गे सोडण्याची घोषणा करण्यात आली. ही बाब कळताच खासदार सुप्रिया सुळे यांनी तातडीने रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधून रेल्वे थेट पुण्याकडे रवाना करण्यास सांगितले. त्यानंतर आज सकाळी साडेअकराच्या सुमारास ती पुण्यात सुखरूप पोहोचली असून दौंड आणि पुण्यातील अनेक प्रवाशांनी खासदार सुळे यांचे आभार मानले आहेत.
दिल्लीहून निघालेली हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस काल नगर स्टेशनमध्ये पोहोचली. त्यावेळी काही तांत्रिक अडचणी सांगत तब्बल १२ तास ती तेथेच थांबविण्यात आली. त्यानंतरही नेहमीच्या मार्गाने न सोडता ती सोलापूर मार्गे जाईल असे अचानकच प्रवाशांना कळविण्यात आले. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. तसे झाल्यास पुणे आणि दौंड येथे उतरणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होणार होती.
ही बाब प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाच्या लक्षात आणून दिली. तथापि काहीही फायदा झाला नाही. त्यावेळी काही प्रवाशांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्यातील पदाधिकारी लोचन शिवले आणि बारामती लोकसभा मतदार संघाचे समन्वयक प्रवीण शिंदे यांच्या मार्फत खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी संपर्क साधून ही बाब लक्षात आणून दिली. त्यानुसार खासदार सुळे यांनी तातडीने रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधला. रेल्वेच्या पुणे विभागीय व्यवस्थापक रेणू शर्मा यांच्याशी तत्काळ संपर्क साधून प्रवाशांच्या अडचणी सांगितल्या. त्यांना प्रवाशांची अडचण लक्षात आणून देत त्यांच्या सोयीसाठी व्यवस्था करण्यास सुचविले.
त्यानंतर अखेर रेल्वे विभागाने निजामुद्दीन एक्स्प्रेस सोलापूरकडे न वळवता नेहमीच्या मार्गाने दाैंडमार्गे पुण्याला आणण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गाडी आज सकाळी साडेकरच्या सुमारास पुणे रेल्वे स्थानकावर पोहोचली. खासदार सुप्रिया सुळे यांनी रात्रीतूनच तातडीच्या सर्व प्रक्रिया पार पाडत सर्व प्रवाशांना सुखरूप दौंड आणि पुण्यात पोहोचण्यासाठी मदत केली याबद्दल सर्व प्रवाशांनी त्यांचे आभार मानले आहेत.