‘…तर देव आणि बाळासाहेब मला माफ करणार नाहीत’
शिंदे गटात जाण्याच्या चर्चेनंतर किर्तीकरांची 'ही' भुमिका
मुंबई दि ९ (प्रतिनिधी) – एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर शिवसेनेचे बारा खासदारही शिंदे गटात सामील झाले होते. त्यानंतर खासदार गजानन किर्तीकर हेदेखील शिवसेना सोडून शिंदे गटाला पाठिंबा देणार असल्याची चर्चा सुरू होती. पण किर्तीकर यांचे पुत्र आणि शिवसेनेचे उपनेते अमोल किर्तीकर यांनी मात्र त्यांच्या शिंदे गटात सामील होण्याला विरोध केला. मुलाच्या विरोधाने गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय बदलल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शिंदे गटाचा प्रयत्न फसला आहे. तरीही दस-या पर्यंत शिंदे गट प्रयत्न करणार आहे.
शिंदेना दिवसेंदिवस राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात किर्तीकर शिवसेना सोडून शिंदे यांना पाठिंबा देणार असल्याची चर्चा सुरु होती. किर्तीकर यांच्या शस्त्रक्रियेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या तब्येतीच विचारपुस केली होती. त्यानंतर त्यांनीदेखील मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’वर जाऊन भेट घेतली होती. त्यामुळे किर्तीकरदेखील शिंदे गटात सामील होण्याच्या सुरु झाल्या होत्या.पण उद्धव ठाकरे यांनी अमोल किर्तीकर यांची उपनेतेपदी नियुक्ती करून चर्चांना पुर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. शिंदे गटाकडून गजाजन किर्तीकर यांना केंद्रात मंत्रीपद तर त्यांच्या मुलाला विधान परिषदेवर संधी देण्याची ऑफर देण्यात आली होती. यावर किर्तीकर यांनी ‘शिवेसना आणि उद्धव ठाकरे संकटात असताना त्यांची साथ सोडली तर देव मला माफ करणार नाही. असा निर्णय घेतला तर माझ्या सारखादुसरा मतलबी नसेल, अशी प्रतिक्रीया अमोल किर्तीकर यांनी दिली आहे.
वयोमानानुसार गजानन किर्तीकर आगामी लोकसभा निवडणूक लढवण्यास फारसे उत्सुक नाहीत अशावेळी उपनेते झालेले अमोल किर्तीकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असल्याची माहिती आहे त्यामुळे पुत्रप्रेमापोटी कीर्तीकर यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय बदलला आहे.