..तर राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुप्रिया सुळे होऊ शकतात
शरद पवारांचे निकटवर्तीयांचा मोठा दावा, पण नव्या अध्यक्षासाठी ही नावे चर्चेत
मुंबई दि २(प्रतिनिधी)- शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. पवारांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण असणार यावरुन अनेक तर्क लावले जात आहेत. त्यातच शरद पवार यांचे निकटवर्तीय विठ्ठलशेठ मणियार यांनी मोठे भाष्य केले आहे.
शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याची घोषणा केल्यानंतर एकच खळबळ उडाली. राष्ट्रवादी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांपासून सर्व सामान्य कार्यकर्ते सर्वांनी शरद पवार यांनी तातडीने हा निर्णय मागे घ्यावा, अशी आग्रही भूमिका घेतली. पण शरद पवारांसोबत बराच काळ राहिलेले मणियार यांनी शरद पवार आणि अध्यक्षपदावर मोठे विधान केले आहे ते म्हणाले, विठ्ठल मणियार म्हणाले की शरद पवारांचा वारसदार ठरवताना अनेकांची नावे पुढं येतील. पवारांच्या डोक्यात काय आहे हे महत्वाचे आहे. त्यांच्या मनात एखादे नाव असले तरीदेखील ते सर्वांना विचारात घेऊन करतील. पण त्यांच्या सहकार्यांची वेगळ्याच नावावर सहमती झाली तर ते आपला निर्णय देखील बदलू शकतात. सुप्रिया सुळेंना पंधरा वर्षांचा राजकीय अनुभव आहे. त्यांचा सामाजिक आणि राजकीय अभ्यास आहे. राज्यात आणि देशात देखील त्या आपला जम बसवत आहेत. त्यामुळे त्या देखील होऊ शकतात. असा दावा मणियार यांनी केला आहे. त्याचबरोबर शरद पवार गेल्या काही वर्षापासून राजकीय कामांपेक्षा सामाजिक कामांकडे लक्ष देत होते. त्यांचा हा निर्णय लोकांच्या दृष्टीने धक्कादायक असेल पण त्यांनी हा निर्णय विचारांती घेतला असेल, असे मणियार यांनी सांगितले आहे. तसेच अजित पवारांच्या संभाव्य बंडामुळे हा निर्णय घेतला आहे का? ही शक्यता त्यांनी फेटाळली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पुढचा अध्यक्ष कोण असेल? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. यामध्ये प्रामुख्याने चार नावं समोर आली आहे. यामध्ये सुप्रिया सुळे, अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि जयंत पाटील या नावांची चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवीन अध्यक्षाची निवड करण्यासाठी समिती स्थापन करण्यात येणार आहे. ती समिती हा निर्णय घेणार आहे.