पिंपरी चिंचवड दि १२(प्रतिनिधी)- पिंपरी चिंचवडमध्ये किरकोळ वादातून पीएमपीएमएल बस चालकाला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. बसला एक दुचाकी आडवी येत असल्याने चालकाने ती दुचाकी काढायला लावली. या कारणावरुन दुचाकीवर असलेल्या तरुणाने बसमध्ये शिरुन बस चालकाला बेदम मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनमुळे बस चालकांच्या सुरक्षेचा प्रश्न एैरणीवर आला आहे.
पिंपरीच्या नेहरुनगर येथील संतोषी माता चौकात हा प्रकार घडला आहे. ऋषिकेश घोडेकर असे संबंधित तरुणाचे नाव असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार नेहरुनगर परिसरातील संतोषी माता चौकातून एक पीएमटी बस जात असताना रस्त्यामध्ये एक दुचाकी आडवी येत होती त्यामुळे बस चालकाने ती बाजूला घेण्यास सांगितली. या गोष्टीचा दुचाकीस्वाराला राग आला. त्याने थेट बसमध्ये चढून बस चालकाला दमदाटी सुरु केली. ‘तुला माहित आहे का मी कोण आहे’, असे म्हणत बस चालकाला मारहाण केली. पण यावेळी कंडक्टर आणि प्रवाशांनी बघ्याची भुमिका घेतली होती. कोणीतरी याचा व्हिडिओ शूट केल्याने हा प्रकार समोर आला आहे.
पुण्यात पीएमटी चालकाला दमदाटी करण्याचे प्रकार याआधीही घडलेले आहेत. किरकोळ कारणावरुनही चालकाला मारहाण केली जाते. या घटनेने पुन्हा एकदा पीएमपी चालकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. दिवसेंदिवस या घटनांमध्ये वाढ होताना पहायला मिळत असून बस चालकांची सुरक्षा धोक्यात आली आहे. पीएमटी प्रशासनाने यावर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.