शिंदे गटातील खासदारासमोर ‘पन्नास खोके’च्या घोषणा
पन्नास खोके शिंदे गटाची पाठ सोडेना, घोषणांचा व्हिडिओ व्हायरल
अहमदनगर दि १२(प्रतिनिधी)- पन्नास खोके शिंदे सरकारची पाठ सोडत नसल्याचे दिसत आहे. पन्नास खोकेवरुन नेत्यांची सुरु असलेली लढाई आता कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचली आहे. शिंदे गटात गेलेल्या एका खासदारासमोर ठाकरेंच्या शिवसैनिकांनी पन्नास खोकेच्या घोषणा दिल्या. याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे राहुरी तालुक्यातील टाकळीमिया ग्रामपंचायतीत एका बैठकीसाठी आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा गट आमने सामने आला. यावेळी दोन्ही बाजूंनी झालेल्या घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला. यावेळी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदेच्या घोषणा देण्यास सुरुवात केली त्याला उत्तर देत ठाकरे गटाच्या समर्थकांनी ‘पन्नास ओके एकदम ओके. या गद्दारांचा करायचं काय खाली डोकं वर पाय,’ अशा घोषणा दिल्या. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते.यावेळी पोलीसांनी हस्तक्षेप करत वातावरण शांत केले. खासदार लोखंडे यांनी मात्र बैठक आवरती घेत तेथून निघून जाणे पसंत केले. पण सोशल मिडीयावर याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

पोलिसांनी ‘५० खोके एकदम ओके’, अशा घोषणा देणाऱ्या सात जणांना ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या कार्यकर्त्यांना पोलिस ठाण्यात नेण्यात आले असून त्यांच्याविरूद्ध पुढील कारवाई केली जाणार आहे. शिंदे गट मजबूत करण्यासाठी खासदार लोखंडे यांचा दौरा सुरू आहे. पण त्यांचे स्वागत पन्नास खोक्यांच्या घोषणांनी झाले आहे.