‘या’ खात्यांवरून शिंदेगट भाजपा मंत्र्यात वादाची ठिणगी?
महत्वाच्या खात्यांच्या आग्रहामुळे खातेवाटप रखडले
मुंबई दि १२ (प्रतिनिधी)- शिंदे फडणवीस सरकारमधील मंत्र्यांचे रुसवे फुगवे काही केल्या कमी होत नाहीत. मंत्रिमंडळात समावेश न झाल्याने काही आमदार नाराज आहेत तर ज्यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला आहे. त्यांनी विशिष्ठ खात्यांचा आग्रह धरल्याने शिंदे आणि फडणवीस यांची डोकेदुखी वाढली आहे.
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. पण मंत्रिमंळाचा विस्तार मात्र तब्बल ३९ दिवसांनी झाला. नव्या १८ मंत्र्यांचा शपथविधी होऊन तीन दिवस झाले तरी खातेवाटप झालेले नाही. येत्या १७ ऑगस्टपासून विधिमंळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्याआधी खातेवाटप होणे गरजचे आहे. मात्र शिंदे गट आणि भाजपच्या मंत्र्यांमध्ये महत्वाच्या खात्यासाठी चढाओढ सुरु असल्याने खातेवाटप रखडले आहे. गृह, महसूल, अर्थ, जलसंपदा, सहकार, ग्रामविकास ही महत्त्वाची खाती भाजपाला हवी आहेत. तर, फडणवीस सरकारच्या काळात शिवसेनेच्या वाट्याला जी खाती आली होती, तीच खाती पुन्हा देण्याची तयारी भाजपाने दर्शविली आहे. तर शिंदे गटाने आधीच्या उद्योग, परिवहन, आरोग्य, कृषी या खात्यांबरोबरच गृह. महसूल, सार्वजनिक बांधकाम, ग्रामविकास व आरोग्य या खात्यांसाठी आग्रही आहे.
मंत्रीमंडळ विस्तारानंतर खात्यावरूनही संघर्ष सुरु असल्याने नवीन मंत्री किती दिवस बिनखात्याचे मंत्री राहणार हा चर्चेचा विषय बनला आहे. १७ तारखेपर्यंत खातेवाटप न झाल्यास विरोधक सरकारवर पुन्हा टिका करण्याची शक्यता आहे. पण सध्या तरी फडणवीस आणि शिंदे यांची डोकेदुखी मंत्र्यांनी केलेल्या दाव्यामुळे वाढली आहे.