उस्मानाबादमध्ये उरुसात वळू घुसल्याने चेंगराचेंगरी
वळू घुसून उडालेल्या धावपळीचा व्हिडीओ व्हायरल, अनेक भाविक जखमी
उस्मानाबाद दि ९(प्रतिनिधी)- उस्मानाबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरात आयोजित उरुसामध्ये वळू उधळल्याने अनेक भाविक जखमी झाले आहेत. जखमी भाविकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावेळी चेंगराचेंगरी देखील झाल्याची माहिती आहे.
उस्मानाबाद शहरात सध्या हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी रहे यांचा उरूस सुरू आहे. मागील दोन वर्षात कोरोनामुळे हा उरुस साधेपणाने साजरा करण्यात आला होता. पण यावर्षी मोठ्या उत्साहात उरुसाचे आयोजन करण्यात आले होते. त्याच उरुसामध्ये सुरू असलेल्या धार्मिक कर्यक्रमाला तब्बल १५ ते २० हजार लोकांची उपस्थिती होती. पण आज पहाटेच्या सुमारास अचानक एक वळू उधळल्याने भाविकांची धावपळ उडाली. यामध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेत २० ते २५ भाविक जखमी झाले आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत गर्दीवर नियंत्रण मिळवलं. तसेच, जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जखमींपैकी काहीजणांवर उपचार सुरु आहेत. तर काहीजण उपचार घेऊन घरी परतले आहेत. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी रहे यांच्या धार्मिक सोहळ्यानिमित्त उस्मानाबादमध्ये हा उरुस असतो. दोन ते तीन दिवस हा उरुस चालतो. रात्रभर या उरुसात सहभागी होण्यासाठी भाविक गर्दी करत असतात. कोरोनाच्या काळानंतर पहिल्यांदाच हा उरुस होत असून सर्वधर्मियांचा यामध्ये मोठा सहभाग असतो.