मुळा मुठेत राडारोडा टाकणा-यांवर कडक कारवाई करा
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची मागणी, महानगरपालिका आणि पुणे पोलिसांना निवेदन
पुणे २७(प्रतिनिधी)- मुळा मुठा नदीपात्रात शांतीनगर कडुन ॲम्युनिशन फॅक्टरी,खडकी कडे जाणाऱ्या रस्त्यावरील शांतीनगर येथील नदीपुलाच्या डाव्या साईड कडील मुख्य नदी प्रवाहात काही समाजकंटकांनी गेल्या अनेक दिवसांपासून जवळपास ५०० मीटर चे मुख्य नदी पात्र बुजविण्याचा प्रयत्न चालू आहे.
राजरोस पणे दिवसरात्र अवैध वाहतूक करुन राडारोडा टाकण्याचा निंदनीय प्रकार काही लोकांकडून सातत्याने केला जात आहे. या प्रकाराची गांभीर्याने दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने स्थानिक रहिवाशांना घेत थेट नदीपात्रात उतरून दोन दिवसांपूर्वी आंदोलनही केले होते , नदीचा प्रवाह बाधित होऊन नदीकडील भागात पावसाचे पाणी घुसून भविष्यात पुर स्थिती निर्माण होणार आहे. नदीपात्रात मुख्य नदी प्रवाह बाधित करणार्यांना कडक शासन होऊन संबंधित समाजकंटकांवर कडक कारवाई करण्याची मागणी पुणे मनपा आयुक्त , पुणे जिल्हाधिकारी कार्यालय , पोलिस स्टेशन यांना निवेदन देऊन करण्यात आलेली होती. पण कोणतीही कारवाई झालेली नाही.
बेकायदेशीर कृत्य थांबले नसल्याने आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने प्रवक्ते प्रदीप देशमुख यांच्या नेतूत्वाखालील शिष्टमंडळाने सरचिटणीस विनोद पवार, किरण अडागळे यांच्या समावेत पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह आयुक्त संदिप कर्णिक यंना निवेदन दिले व संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे.