पुणे दि ३(प्रतिनिधी)- पुण्यातील बाळासाहेबांची शिवसेनेतील (शिंदे गट) नेते, माथाडी जिल्हाध्यक्ष निलेश माझिरे यांच्या पत्नीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोनाली यांनी विष प्राशन करत आत्महत्या केली. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.
निलेश माझिरे हे शिंदे गटाच्या कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांची मनसेमधून काही कारणांमुळे हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी बाळासाहेबांची शिवसेनेत प्रवेश केला होता, त्यानंतर त्यांना जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली होती. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे गटातील नेते निलेश माझिरे यांच्या पत्नी सुुप्रिया निलेश माझिरे यांनी गुरुवारी सकाळी विषप्राशन केले होते. त्यानंतर त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र रुग्णालयात उपचार सुरू असतानाच गुरुवारी रात्री त्यांचे निधन झाले. कौटुंबिक वादातून ही आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. सुप्रिया माझिरे यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन अपत्ये आहेत.
कौटुंबिक वादातून माझिरे यांच्या पत्नीने आत्महत्या केली असली तरी हा वाद नेमका काय होता हे अजून कळलेलं नाही.पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.