गेल्या काही महिन्यांपासून कोयता गँगमुळे पुण्यातील नागरिक हैराण झाले आहेत. असाच प्रकार काही दिवसांपूर्वी घडला होता. सिंहगड रोडवरील किरकटवाडीमध्ये कोयता गँगच्या 30 ते 40 गुंडांनी धुडगूस घालून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता.यावेळी त्यांनी एका तरुणावर हल्ला केला. या गोंधळामध्ये महिला तसेच वृद्ध व्यक्ती जखमी झाले आहेत. याआधीही नागरिकांनी पोलिसांकडे या संदर्भात अनेक तक्रारी केल्या. पण यावर कोणतीही कारवाई न झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केल्या आहे. दरम्यान, यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
सुप्रिया सुळे यांनी ट्विट केले की, “सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी येथे कोयता गॅंगच्या 30 ते 40 गुंडांनी धुडगूस घालून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. या गुंडांनी दगडफेकही केली होती. यात काही महिला, वृद्ध व्यक्ती जखमी झाल्या. पोलीसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केली, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. पुणे परिसरात कोयता गँगचे कारनामे कमी होण्याचे नाव घेत नाहीत. गृहमंत्रालय निष्क्रिय असल्याने हे प्रकार घडत आहेत. कायद्याचा धाक संपला आहे. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी हा प्रकार गांभिर्याने घेऊन संबंधितांवर कठोरात कठोर कारवाई करावी.” अशी मागणी करत त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.
तसेच शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली. पुणे शहर आणि जिल्ह्याकडे पालकमंत्र्यांचे यांचे लक्ष नसल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी नाव न घेता अजित पवार यांच्यावर टीका केली. “राज्यत शांतता राहिली पाहिजे. त्यासाठी सर्वांनी पुढे येऊन काम करणे गरजेचे आहे. राज्यात सध्या मुली, महिलांवर अन्याय अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. तसेच, गुंडागर्दी वाढली असून पुण्यात कोयता गँगने धुडगूस घातला आहे. त्यांच्यावर पोलीस आयुक्तांचा वचक राहिलेला नाही. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस कुठे आहेत? आता असा सवाल उपस्थित केला जात आहे.” अशा शानदार रोहित पवारांनी टीका केली.