कात्रज चौकातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी बैठक घेऊन तोडगा काढा
खासदार सुप्रिया सुळे यांच्या महापालिका आयुक्तांना सूचना
पुणे, दि. २३, (प्रतिनिधी) – कात्रज चौकात सुरू असलेल्या उड्डाणपूल आणि रस्ता रुंदीकारणाच्या कामामुळे वाहतुकीच्या वेळी प्रचंड कोंडी होत असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महावितरण आणि पाणीपुरवठा विभागाची तातडीने बैठक लावून समन्वय साधावा, अशा सूचना खासदार सुप्रिया सुळे यांनी आज महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना दिल्या.
खासदार सुळे यांनी आज ऐन गर्दीच्या वेळीच सकाळी नऊ वाजता कात्रज चौकाला भेट देऊन येथील वाहतूक कोंडी आणि चालू कामांचा आढावा घेतला. कामांची पाहणी करत त्यांनी अधिकाऱ्यांना कामे त्वरित मार्गी लावण्याचे निर्देश दिले. तसेच महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी या कोंडीवर तोडगा काढण्यासाठी स्वतः पुढाकार घेऊन काम करणाऱ्या सर्व संबंधित संस्थांची संयुक्त बैठक बोलावून वाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्था काय करता येईल यावर चर्चा करावी, अशा सूचना दिल्या.
उड्डाणपूल व रस्त्याच्या कामांसह महावितरण, सर्व्हिस रोड, पाण्याची पाईपलाईन अशी सर्वच कामे एकत्रितपणे सुरु आहेत. परिणामी येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र आहे. सर्वच प्रकारच्या वाहनधारक, पादचारी, रस्त्यालगतचे व्यावसायिक, दुकानदार तसेच स्थानिक नागरिकांनाही या कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याच्या मध्येच उड्डाणपुलासाठीचे खांब उभे करण्याचे काम सुरू आहे. त्याचवेळी दोन्ही बाजूला सर्व्हिस रस्ता आणि रुंदीकरणही चालू आहे. परिणामी वाहतुकीसाठी उपलब्ध असलेला रस्ता अत्यंत अपुरा झाला आहे, इतकेच नाही, तर त्याची दशाही अत्यंत वाईट झाली आहे. परिणामी लहान मोठे अपघात देखील होत आहेत. ही गंभीर बाब आहे, असे सुळे यांनी म्हटले आहे.
या कामांबाबत शासनाच्या विविध विभागांमध्ये समन्वय आणि पर्यायी उपाययोजनेचा अभाव स्पष्टपणे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत कात्रज चाैकातील वीज, पाणी पाईप लाईन, पुलाचे काम आणि सेवा रस्ते या चार विषयांवर सविस्तर चर्चा झाली होती. त्यावेळी महापालिकेने ही कामे पूर्ण करण्यासाठी १ मे २०२३ ची डेडलाईन दिली होती. तथापि कामाची गती, आवाका आणि पद्धत पाहता ही तारीख गाठणे शक्य होईल अशी परिस्थिती परिस्थिती सध्या तरी दिसत नाही, असा आरोप त्यांनी यावेळी केला. आम्ही या कामाचा सातत्याने पाठपुरावा करीत आहोत. परंतु महापालिका प्रशासनाचे अपेक्षित सहकार्य अद्यापही मिळत नसल्याने ही कामे संथगतीने सुरु आहे, असे त्या म्हणाल्या. माजी सनदी अधिकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पुरंदर-हवेलीचे नेते संभाजीराव झेंडे, माजी नगरसेवक युवराज बेलदरे, संतोष फरांदे यांच्यासह स्थानिक नागरीक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.