पुण्यातील महाविद्यालयात शिक्षकाची विद्यार्थ्याला बेदम मारहाण
मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, शिक्षकाचे वागणे संतापजनक
पुणे दि २१(प्रतिनिधी) – महाविद्यालयीन विद्यार्थीनी शिक्षकांना पाहून शेरोशायरी केल्याच्या गैरसमजातून काही शिक्षकांनी विद्यार्थ्याला अमानुषपणे लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथील काॅलेजवर ही घटना घडली आहे. याचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानमंदिर जुनियर कॉलेज आळे येथे हा प्रकार घडला आहे. शनिवारी सकाळी ज्युनिअर कॉलेजमधील मुलांच्या घोळक्यातील एका मुलाने शिक्षकांना पाहून शेरोशायरी केली. मात्र, याबाबत कोणतीही शहानिशा न करता शाळेतील शिक्षकांनी एका विद्यार्थ्याचे केस पकडून त्याला मारहाण केली आहे. माझी काहीच चूक नाही अशी विद्यार्थ्याने वारंवार विनवणी करुनही शिक्षक त्याला सतत लाथा मारत राहिला. याच वेळी तिथे उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये घटनेचे चित्रिकरण केले. त्यानंतर काही वेळातच हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे शिक्षकविरोधात चांगलाच संताप व्यक्त केला जात आहे.
या प्रकारामुळे विद्यार्थीसह पालकांकडून विद्यालया विरोधात नाराजी व्यक्त केली आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शाळा प्रशासनाने या घटनेची चौकशी करण्यासाठी तत्काळ बैठक घेतली. पण या घटनेच्या व्हिडिओवर अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.