
नागपुरात पेट्रोल पंप लुटीचा भयानक थरार पण…
लुटीची भयानक घटना सीसीटीव्हीत कैद, चाकूचा धाक दाखवत कर्मचाऱ्यांना मारहाण
नागपूर – नागपूर शहरातील माटे चौक परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. पेट्रोल पंपावर आलेल्या काही गुंडांनी पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना लुटण्याचा प्रयत्न करत त्यांना मारहाण केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
नागपूर शहरातील माटे चौकातील विशाल पेट्रोलियमवर हा प्रसंग घडला आहे. सायंकाळी साडेचारच्या सुमारास तीन ते चार दुचाकीवर बसून गावगुंडांची एक टोळी पेट्रोल पंपावर दाखल झाली. ते सर्व दारूच्या नशेत होते. या गावगुंडानी पेट्रोल भरणाऱ्या इतर वाहन चालकांना धडक देत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी त्यांना रोखले असता त्यांनी पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांशी वाद घालत त्यांना मारहाण सुरू केली. यावेळी त्यांनी चाकूचा धाक दाखवत पंप कर्मचाऱ्यांच्या हातातील पेट्रोल पंपाचे पैसे लुटण्याचाही प्रयत्न केला. मात्र इतर वाहन चालकांनी आरडाओरडा केल्यामुळे हे गाव गुंड धमक्या देत तिथून पळून गेले. ही संपूर्ण घटना पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तक्रार नोंदवली असून सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
नागपूरमध्ये मागील काही महिन्यापासून गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाली आहे. मध्यंतरी एका पेट्रोलपंप चालक महिलेला गुंडानी मारहाण करत माफी मागण्यास भाग पाडले होते. त्याचाही व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता.