Latest Marathi News

लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून पहिल्या उमेदवाराची घोषणा

ठाकरे गटाचा मातब्बर नेता या मतदारसंघातून महायुतीला देणार आव्हान, ठाकरेंचे महाविकास आघाडीत पक्षांना सुचक इशारा

मुंबई दि २३(प्रतिनिधी)- आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. पण उद्धव ठाकरेंनी यात आघाडी घेत लोकसभेसाठी पहिल्या उमेदवाराची घोषणा करत लोकसभेचे रणशिंग फुंकले आहे. यावेळी उद्धव ठाकरेंनी महायुतीला आव्हान देण्याबरोबरच महाविकास आघाडातील घटक पक्षांनाही सुचक इशारा दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत बेबनाव होण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुका जवळ आल्याने अनेक पक्षांनी आपली मोर्चेबांधणी सुरु केली आहे. उद्धव ठाकरे यांनी माजी खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांना रायगड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी घोषित केली आहे. महाविकास आघाडीचे जागावाटप अद्याप घोषित झालेले नाही. त्यापूर्वीच उद्धव ठाकरे यांच्याकडून रायगडमधून उमेदवाराची घोषणा करण्यात आल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रायगड लोकसभा मतदारसंघातून माझी उमेदवारी जाहीर केल्याचा दावा गीते यांनी केला आहे. त्याचबरोबर कोकण पदवीधर मतदारसंघासाठी उबाठा गटाचा उमेदवार उद्या जाहीर केला जाईल, अशी माहिती अनंत गीते यांनी दिली आहे. रायगड लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार हे सुनील तटकरे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडल्यानंतर सुनील तटकरे हे अजित पवार यांच्यासोबत आहेत. त्यामुळे या मतदारसंघातून शरद पवार गटाचा उमेदवार निवडणुक लढवेल अशी शक्यता होती. पण उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि शरद पवार गटाला धोबीपछाड देत आपला उमेदवार घोषित केला आहे. महत्वाचे म्हणजे याबाबत महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेसची प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही. त्याचबरोबर यावेळी गीतेंनी मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्याबाबत सुद्धा भाष्य केले. मावळमधून खासदार श्रीरंग बारणे यांचा पराभव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष करेल, असा विश्वासही यावेळी त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आला. दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्यात जागा वाटपासंदर्भात होणारी चर्चा रखडली आहे.

२०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत रायगड मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान खासदार अनंत गिते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांच्यात जोरदार लढत झाली. यात तटकरे यांनी बाजी मारली होती. तटकरे यांनी गीते यांचा सुमारे ३१ हजार ४३८ मतांनी पराभव केला होता. पण आता राजकीय समीकरणे बदलली असल्यामुळे चुरशीची लढत होणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!