ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊतांना अटक
बारसू रिफायनरीचे आंदोलन पेटले, माेठा पाेलिस फाैजफाटा तैनात, आंदोलन चिघळणार?
रत्नागिरी दि २८(प्रतिनिधी)- कोकणातील बारसू रिफायनरीवरून राजकारण चांगलेच पेटले आहे. या रिफायनरीला स्थानिक नागरिकांनी जोरदार विरोध केला आहे. त्यात आज स्थानिक खासदार विनायक राऊत आंदोलकांना भेटायला जात होते, त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यामुळे वातावरण तापले आहे.
बारसू रिफायनरीवरून सध्या जोरदार राजकारण सुरू आहे. हा प्रकल्प करण्याच्या दृष्टीने सरकारच्या हालचाली सुरू आहेत. तर दुसरीकडे विरोधकांनी या प्रकल्पाला विरोध केला आहे. मागील चार दिवसापासुन याला होणारा विरोध वाढला आहे. पण आज बारसू रिफायनरी विरोधातील आंदोलनादरम्यान शिवसेना खासदार विनायक राऊत यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राऊत आंदोलकांना भेटण्यासाठी जात असतानाच पोलिसांनी त्यांना अडवले. त्यावेळी राऊतांनी रस्त्यातच ठाण मांडले. त्यानंतर खबरदारी म्हणून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान बारसूच्या माळरानावर आज मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्धव ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे मोर्चाचं नेतृत्व करणार असल्याची माहिती देण्यात आली होती. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात आहे. सध्या बारसूचे वातावरण तणापुर्ण आहे.
बारसु रीफायनरी आंदोलनात मला व माझ्या सहकाऱ्यांना अटक करण्यात आली. pic.twitter.com/aBmzA7OvAg
— VinayakRaut_Official (@Vinayakrauts) April 28, 2023
बारसू परिसरात परप्रांतीयांनी जमिनी खरेदी केल्या असून प्रकल्प झाल्यास भूमिपुत्रांचा नव्हे, तर परप्रांतीयांचा फायदा होणार असल्याचे राऊत यांनी काल सांगितले होते.तसेच रिफायनरीबाबत शिंदे-फडणवीसांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी खासदार विनायक राऊतांनी केली आहे.