माईकवरुन ती घोषणा आणि पुण्यातील गणेशभक्तांनी केले असे काही…
पुण्यातील गणेशभक्ताचा 'हा' व्हिडीओ सोशल मिडीयावर होतोय व्हायरल
पुणे दि ९ (प्रतिनिधी) – महाराष्ट्रासह देशभरात यंदा दोन वर्षानंतर सगळीकडे आनंदाच्या वातावरणात गणेशोत्सव साजरा करण्यात आला. गेल्या १० दिवसांपासून सुरु असलेल्या उत्साहानंतर आजच्या दिवशी गणेशभक्तांनी भावनिक होत गणरायाला निरोप देण्यात आला. पण या वातावरणातही पुण्यातील गणेशभक्तांची संवेदनशीलता दिसून आली आहे.
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीला उत्साहाच्या वातारणात सुरुवात झाली. शहरातील प्रमुख रस्त्यांवरुन मानाच्या प्रमुख पाच गणपतींना मिरवणुकीत पहिला मान असतो. मानाच्या तिसऱ्या गुरुजी तालीम मंडळाच्या गणपतीची मिरवणूक सुरु होती. नेमक्या त्याचवेळी रुग्णवाहिका आली होती. रुग्णवाहिका येताच गणेशभक्तांना वाट मोकळी करुन देण्याचं माईकवरुन आवाहन करण्यात आले. त्यावर गणेशभक्तांनी तातडीनं बाजूला होत रुग्णवाहिकेला वाट करुन दिली. वाट करुन दिल्यानंतर रुग्णवाहिका संभाजी पुलाच्या दिशेने पुढे निघून गेली. रुग्णवाहिकेला वाट करुन दिल्याबद्दल स्पीकरवरुन मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील गणेशभक्तांचे आभार मानले आहेत. याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.
आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गणेशभक्तांनी संवेदनशीलता दाखवली आहे. नाशिकमध्ये शिवसेवा मित्र मंडळानं मिरवणूक मार्गावरील मशिदीची अजाण सुरु होताचं वाद्य वाजवणे थांबवत संवेदना दाखवली होती.त्याच पद्धतीने पुण्यातही गणेशभक्तांनी दाखवलेल्या संवेदनशीलतेचा व्हिडिओ समाजमाध्यमांमध्ये कौतुकाचा विषय ठरत आहे.