
मीठात ठेवलेला ‘तो’ मृतदेह विच्छेदनासाठी मुंबईकडे रवाना
खुन आणि बलात्काराचा गुन्हाही दाखल, पीडीत कुटुंबाला न्याय मिळणार? Video
नंदुरबार दि १५(प्रतिनिधी)- नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील संशयास्पद मृतावस्थेत आढळलेल्या आदिवासी महिलेचा मृतदेह अखेर ४५ दिवसांनी पोलिसांनी मीठाच्या खड्डयातून बाहेर काढत शवविच्छेदन करण्यासाठी मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात नेण्यात आला आहे. या प्रकरणात बलात्कार आणि खुनाचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे त्या कुटुंबाला न्याय मिळण्याची आशा आहे.
मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याची तक्रार वडिलांनी करूनही पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा नोंदवला होता.पण मुलीवर अत्याचार झाल्याचा दावा करत वडिलांनी तिच्या न्यायासाठी मृतदेह मीठाच्या खड्डयात ठेवला होता. अखेर त्यांची मागणी मान्य करण्यात आली आहे.पोलीस आणि आरोग्य अधिकाऱ्यांचे पथक खडक्या गावात दाखल झाले होते. परंतु, मुंबईत किंवा मुंबईतील डॉक्टरांकडूनच शवविच्छेन करावे, असा आग्रह कुटुंबीयांनी कायम ठेवला़ त्यामुळे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांच्या मदतीने मृतदेह मुंबईतील जे. जे. रुग्णालयात विच्छेदनासाठी पाठविण्याबाबत सर्व प्रक्रिया पूर्ण केली. मिठाच्या खड्डय़ात पुरलेला मृतदेह बाहेर काढून तो रात्री उशिरा विच्छेदनासाठी मुंबईकडे पाठविण्यात आला. प्रसार माध्यमात
मृतदेह ४२ दिवसापासून मीठात ठेवल्याची बातमी प्रसारित झाल्यानंतर गृह विभागाने तातडीने सूत्रे हलवत ही प्रक्रिया पूर्ण केली आहे. तत्पुर्वी पोलीसांनी या प्रकरणी तीन आरोपींना अटक केली आहे.
पीडित कुटुंबाने पोलीस अधीक्षकांसह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विधान परिषदेच्या उपसभापती निलम गो-हे यांना पत्र पाठवून न्यायाची मागणी केली होती. गावातील नागरिकांनीही पोलीसांना पत्र दिले होते. अखेर मृतदेह तपासणीसाठी गेल्याने तपासणीतून काय समोर येणार यावर पुढील पाऊल उचलले जाणार आहे.