पुणे दि ३ (प्रतिनिधी)- शिवसेनेचे बंडखोर आमदार माजी मंत्री उदय सामंतांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकरणी काही शिवसैनिकांना अटक करण्यात आली आहे. पण आता या हल्ल्याबाबत वेगळीच माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे.
उदय सामंत हे ठरवून दिलेल्या मुख्यमंत्र्यांच्या कॅानव्हॅायचा मार्ग सोडून निसर्ग हॅाटेलला जेवण्यासाठी निघाले होते. निसर्ग हॉटेल हे पुण्यात प्रसिद्ध हॉटेल आहे.त्यामुळे उदय सामंत यांनी निसर्ग हॉटेलचा बेत आखला होता. त्यासाठी त्यांनी गुगल मॅपचा आधार घेतला आणि तो मार्ग नेमका आदित्य ठाकरे यांच्या सभेच्या ठिकाणाजवळून जात होता. त्यामुळे त्यांची गाडी पाहून शिवसैनिकांनी हल्ला केला अशी बातमी पोलीस दलातील वरिष्ठ अधिका-यांचे हवाल्याने एका मराठी वृत्तवाहिनीने दिली आहे. त्याचबरोबर उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला झाल्याची घटना जिथे घडली तो मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा रस्ता नव्हता, अशी माहिती भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्ष जगन्नाथ कळसकर यांनी दिली.
एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर सुरत, गुवाहाटी आणि गोवा या ठिकाणी हाॅटेलवर मुक्काम केला होता त्यावेळी आमदार शहाजी पाटील यांचा काय झाडी…काय डोंगार…काय हॉटिल एकदम ओक्के हा डायलाॅग फेमस झाला होता. पण उदय सामंत यांना मात्र हाॅटेलचा मोह चांगलाच अंगलट आला आहे.