दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला
शिंदे गटातील या आमदारांची चर्चा, भाजपा धक्कातंत्र वापरणार
मुंबई दि ११(प्रतिनिधी)- शिंदे, फडणवीस सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत. अशातच दुसऱ्या टप्प्यातील मंत्रीमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला आहे. हिवाळी अधिवेशनापूर्वीच हा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. यावेळी कोणाला संधी मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर तब्बल महिनाभराने मंत्रिमंडळ विस्तार पार पडला होता. त्याआधी शिंदे आणि फडणवीस दोघेच कारभार हाकत होते. ५ आॅगस्टला शिंदे गटातील ९ आणि भाजपातील ९ जणांना कॅबिनेट मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली होती. यावेळी शिंदे गटातील नाराजी उघड झाली होती. मंत्रिमंडळात अद्यापही २० ते २२ मंत्रिपदं शिल्लक आहेत. या मंत्रिपदासाठी अनेक आमदार इच्छुक आहेत. ज्या आमदारांना या मंत्रिमंडळात संधी मिळाली नाही, त्या आमदारांच्या नजरा आता पुढील मंत्रिमंडळाकडे लागल्या आहेत. यावेळी मंत्रिमंडळात दोन्हीबाजूंनी आगामी निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन धक्कातंत्राचा वापर केला जाण्याची शक्यता आहे.
पहिल्या विस्तारात संधी हुकलेले आणि नाराजीच्या चर्चा असलेले आमदार संजय शिरसाट यांना मंत्रिपद नक्की समजले जात आहे. याशिवाय मंजुळा गावित, भरत गोगावले, बच्चू कडू, सदा सरवणकर, प्रकाश आबिटकर, बालाजी किणीकर, योगेश कदम , प्रताप सरनाईक यांचीही नावं चर्चेत आहेत. भाजपाने मात्र आपले पत्ते खुले केलेले नाहीत.