मुंबई दि ११(प्रतिनिधी)- शिंदे गटात जाण्याच्या तयारीत असलेले पण अजून ठाकरेंकडेच अडकून पडलेले खासदार गजानन कीर्तिकर यांच्या शिंदे गटातील प्रवेश अखेर पक्का झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिर येथे त्यांनी जाहीर पक्षप्रवेश केला. हा ठाकरेंसाठी मोठा धक्का आहे.
गजानन कीर्तिकरांनी शिंदेंची साथ दिल्याने आता त्यांच्यासोबत असलेल्या लोकसभा खासदारांची संख्या १३ वर गेली आहे, तर राज्यसभेचे तीन खासदार धरुन ठाकरेंकडे ९ खासदार राहिले आहेत.काही दिवसापुर्वी लोकाधिकार समिती महासंघाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात अध्यक्ष असूनही गजानन कीर्तिकर गैरहजर होते. त्यावेळेस ते नाराज असल्याच्या चर्चा होत्या. एकनाथ शिंदे यांनी त्यांची भेट घेतल्यापासून ते शिंदे गटाच्या वाटेवर होते. महाविकास आघाडीवरील नाराजी जाहीरपणे व्यक्त केली होती. दसरा मेळाव्यातही थेट माध्यमांसमोर कीर्तीकरांनी आपली नाराजी व्यक्त करत भाजपासोबत युती करण्याचा सल्ला दिला होता. गजानन कीर्तिकर हे शिवसेनेचे दिग्गज नेते असून मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत.

गजानन किर्तीकर मागील काही दिवसांपासून द्विधा मनस्थितीत असल्याचं बोललं जात आहे. त्यांचा मुलाला उद्धव ठाकरे यांनी पदाधिकारी केले होते.तसेच २०२४ साली मुलाला खासदारकीचा शब्द दिल्यानंतर ते ठाकरे गटात राहतील अशी शक्यता होती. लटकेंच्या प्रचारातही ते दिसून आले होते. पण मध्यंतरी रामदास कदमांनी त्यांची भेट घेतल्यानंतर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्या होते. पण अखेर कीर्तिकर शिंदे गटात दाखल झाले आहेत.