शिंदे फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला
'या' तारखेला होणार शपथविधी, 'या' मंत्र्यांना मिळणार नारळ, 'हे' आमदार होणार मंत्री
मुंबई दि ३०(प्रतिनिधी)- शिंदे फडणवीस सरकारला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. पण अजूनही बहुचर्चीत मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. शिंदे फडणवीस यांनी यासाठी अनेकवेळा दिल्ली दरबारी हजेरी देखील लावली. उलट शिंदे गटाच्या पाच मंत्र्यांना भाजपाने डच्चू देण्यास सांगितल्याची चर्चा रंगली होती. पण आता अखेर शिंदे फडणवीस सरकारचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
शिंदे फडणवीस सरकारने तब्बल एक वर्ष राज्यमंत्रीविना आपला कारभार हाकला आहे. तसेच एका एका मंत्र्याकडे दोन दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. त्याचबरोबर एकट्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सहा जिल्हांचे पालकमंत्री आहे. शिवाय सहा खात्यांचा कारभार देखील ते पाहत आहेत. यावरून विरोधकांनी जोरदार टिका देखील केली होती. बच्चू कडू यांनी तर या सरकारमध्ये मंत्रिमंडळ विस्तार करण्याची धमक नसल्याचे सांगत घरचा आहेर दिला होता. पण आता अखेर काल अमित शहांसोबत झालेल्या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तार करण्याचे नक्की झाले आहे. येत्या २ जुलै किंवा ५ जुलैला शिंदे फडणवीस सरकारचा शपथविधी होणार आहे. राजभवनावर छोटेखानी समारंभात हा विस्तार होणार आहे. यावेळी विस्तारात महिलांनादेखील संधी दिली जाणार आहे. या विस्तारात शिंदे गट आणि भाजपच्या आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे. त्यामुळे या मंत्रिमंडळ विस्तारात कोणाला संधी दिली जाणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
मंत्रिमंडळ विस्तार करताना विद्यमान मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेतला जाणार आहे. यात सुमार कामगिरी करणाऱ्या मंत्र्यांना नारळ दिला जाण्याची शक्यता आहे. अर्थात हे मंत्री शिंदे गटातील आहेत की भाजपामधील याची माहिती नसली तरीही काही दिवसापुर्वी झालेली चर्चा पाहता शिंदे गटातील मंत्र्यांना डच्चू दिली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.