कुटुंबीयांच्या विरोधामुळे प्रेमीयुगलाने केली आत्महत्या
नदीकिनारी सापडले मृतदेह, हत्या की आत्महत्या गावात चर्चा, पोलीसांनाही संशय
नांदेड दि २५(प्रतिनिधी)- नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यात गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या प्रेमीयुगलाचा मृतदेह मुगट गावातील गोदावरी नदीच्या किनारी सापडला. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. या दोघांच्या प्रेमाला घरच्यांना विरोध असल्यामुळे या प्रेमीयुगलाने टोकाचा निर्णय घेत आत्महत्या केली आहे.
विकास धोंडिबा तुपेकर आणि ऋतुजा बालाजी गजले असे मृत प्रेमीयुगुलाचे नाव आहे. मृत विकास तुपेकर आणि ऋतुजा गजले हे दोघे मुगट गावात शेजारी राहतात. दरम्यान, या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. त्यांच्या या प्रेमसंबंधाची कुणकुण कुटुंबीयांना लागली होती. याच विषयावरून अनेकवेळा वाद होऊन विकासला मारहाण देखील करण्यात आली होती. पाच दिवसांपूर्वी हे दोघे बेपत्ता झाले होते. त्यांचा शोध घरचे घेत होते. हे दोघेही गावात दिसत नसल्याने चर्चा सुरू झाल्या होत्या. अखेर २३ मे रोजी सायंकाळी त्यांचा मृतदेह गावातील गोदावरी नदीच्या काठावर कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. दोघांचेही मृतदेह हे कुजले होते. त्यांचा चेहरा ओळखू येत नव्हता. ही घटना गावात समजताच खळबळ उडाली होती. पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पण या घटनेने खळबळ उडाली असुन चर्चा होत आहे.
पोलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा केला असून या प्रकरणी पोलिसांनी आकास्मिक मृत्यूची नोंद केली आहे. दरम्यान त्यांनी आत्महत्या केली की त्यांची हत्या करण्यात आली आहे या बाबत गावात उलट सुलट चर्चा सुरू आहेत. पोलिसांनी देखील त्या दृष्टीने तपास करण्यास सुरुवात केली आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.