
मुंबई दि १८ (प्रतिनिधी)- शिंदे फडणवीस सरकार स्थापन होऊन दीड महिने उलटल्यानंतर बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्तार पार पडला पण त्यानंतर शिंदे गटातील नाराजी उघड झाली. पण आता मंत्रिमंडळ विस्ताराची दुसरी तारीख ठरली आहे. येत्या १५ सप्टेंबरपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. विधिमंडळाचं अधिवेशन पार पडल्यानंतर दोन आठवड्यात मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शिंदे फडणवीस सरकारने दीड महिन्यांनी मंत्रिमंडळ विस्तार केल्यानंतर चार दिवसापूर्वी खातेवाटप जाहीर झाले. पण मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने त्याचबरोबर दुय्यम खाते वाटपावरुनही अनेकांनी नाराजी व्यक्त केली. खासकरून शिंदे गटातील नाराज उघडपणे समोर आली. त्यामुळे दुस-या मंत्रिमंडळ विस्तारात नाराजी दूर करण्याचं आव्हान शिंदे फडणवीसांसमोर असणार आहे. त्यामुळे मंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे पाहण्यासाठी १५ सप्टेंबर पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.पण दुस-या टप्प्यात राज्यमंत्रीपदावर बोळवण केली जाण्याची शक्यता आहे. कारण पहिल्या विस्तारात सर्वांना कॅबिनेट मंत्रिपद दिल्याने सध्या राज्यमंत्रीपदे रिक्त आहेत.
एकनाथ शिंदे गटातील बच्चू कडू, संजय शिरसाट, भरत गोगावले यांनी मंत्रीमंडखात स्थान न मिळाल्याने आपली नाराजी व्यक्त केली होती. आता त्यांची नाराजी दुर होणार की नव्या नाराजांची भर पडणार हे येत्या १५ सप्टेंबरला स्पष्ट होणार पण तूर्तास मंत्रिपदासाठी इच्छुक आमदारांनी लाॅबिंग करण्यास सुरूवात केली आहे.