एकनाथ शिंदेंमुळे उद्धव ठाकरे मुंबईचा गड जिंकणार?
भाजपाच्या अंतर्गत सर्वेक्षणात धक्कादायक माहिती समोर
मुंबई दि १८ (प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केले आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. पण या सर्व घडामोडींमध्ये जनतेत उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूती निर्माण झाल्यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपाला फटका बसण्याची शक्यता आहे. एका सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे.
भाजपने एक सर्वे केला आहे आणि त्यात नागरिकांमध्ये उद्धव ठाकरेंबद्दल सहानुभूतीची लाट निर्माण झाली आहे त्याचा भाजपला फटका बसेल असा अंदाज व्यक्त केला आहे. भारतीय मतदार भावनिक आहे. एकनाथ शिंदे यांनी चूक केल्याचा नागरिकांचा सुर आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना याचा फायदा होऊ शकतो असा भाजपच्या सर्वेचा अंदाज आहे. शिवसेना भाजपाने फोडली असा आरोप होऊ नये म्हणूनच एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यात आले आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केल्यानंतर शिवसेनेला २०१९ मध्ये मिळालेल्या १८ टक्के मताला भाजपाकडे खेचण्याचा मनसुबा त्यामागे आहे. पण त्यांचा सर्वेक्षणातून वेगळीच माहिती समोर आल्यामुळे भाजपा वेगळी रणनिती वापरण्याची शक्यता आहे.
मुंबई महापालिकेवर गेली २५ वर्ष शिवसेनेची सत्ता आहे. आता मुंबईसह इतर महापालिका निवडणूका जवळ आल्या आहेत. त्यावेळी जर मतदार ठाकरेंकडे वळला तर भाजपाच्या शत प्रतिशत भाजपा या घोषणेला सुरंग लागू शकतो तसेच शिंदे गटही फुटू शकतो. पण तसे होऊ नये यासाठीचे नियोजन भाजपाकडून केले जाण्याची शक्यता आहे.