कोर्टाच्या निर्णयानंतर मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरली
या तारखेला होणार शिंदे फडणवीस सरकारचा विस्तार, यादी तयार खातेबदलही होणार?
मुंबई दि १२(प्रतिनिधी)- राज्यातल्या सत्ता संघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा बहुप्रतिक्षित निकाल काल जाहीर झाला. राज्यातल्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारला मोठा दिलासा मिळाला असल्याचं स्पष्ट झालं आहे. यानंतर आता दुसरीकडे मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरु झाली आहे. पण आता विस्ताराची तारीख समोर आली आहे.
मंत्रिमंडळ विस्ताराच्या मुद्द्यावर आमदार बच्चू कडू यांनी मोठा दावा केला आहे. साधारण २० ते २१ तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे कडू यांनी सांगितले आहे. सोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिला आहे, त्यामुळे मलाही मंत्रिपद मिळणार, असा दावाही बच्चू कडू यांनी केला आहे. ते म्हणाले, आता सर्व अडथळे दूर झाले आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार होण्यास काही हरकत नाही. एक मंत्री दहा जिल्ह्यांचा कारभार सांभाळत आहे. लोकांची कामे होण्यासाठी तरी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला पाहिजे. मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शब्द दिला होता. शिंदे हे शब्दाचे पक्के आहेत, माझ्या कानावर आलंय की २० किंवा २१ तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार होईल आणि गरजेचं पण आहे. आमच्यासाठी नाही तर जनतेसाठी फार महत्त्वाचं आहे. कोणाला मंत्री बनवतात हा नंतरचा भाग पण विस्तार होणं महत्त्वाचं आहे. आता विस्तार झाला नाही तर मग २०२४ नंतरच विस्तार होईल असं मला वाटत. असे कडू म्हणाले आहेत. दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तर तब्बल सहा जिल्ह्यांचे पालकमंत्री पद आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडेही महसूलमंत्री पदाबरोबरच नगर आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आहे. सहकार मंत्री अतुल सावे यांच्याकडे जालना आणि बीड जिल्ह्यांचे पालकमंत्री पदाचा कार्यभार आहे. आणखीही काही मंत्री अतिरिक्त कार्यभार सांभाळत आहेत.
बच्चू कडू यांनी सत्तासंघर्षाच्या निकालावर देखील भाष्य करत म्हटलं की, काही चुका कोर्टाने दाखवून दिल्या आहेत. मग त्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देण्यासाठी घाई केली, राज्यपालांचे अनेक निर्णय चुकीचे असल्याचं देखील कोर्टाने सांगितले. पण मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे पहिल्यांदा काम रात्रंदिवस करत असल्यामुळे या निसर्गाने देखील त्यांची साथ दिली, काम करणारा मुख्यमंत्री आहे. असं बच्चू कडू म्हणाले आहेत.