अजित पवार आणि राष्ट्रवादीतील अंतर वाढले?
राष्ट्रवादीच्या शिबिरातून अजित पवारांचे नाव गायब, अजित पवारांची नाराजी कायम?
मुंबई दि २०(प्रतिनिधी)- गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण अजित पवार यांनी माध्यमांसमोर येत त्यांची स्पष्ट भूमिका मांडत या चर्चांना पूर्णविराम लावला, पण भाजपा आणि शिंदे गटाच्या नेत्यांनी तो पूर्ण विराम नाहीतर स्वल्पविराम असल्याचा दावा केला होता तो खरा ठरताना दिसत आहे कारण राष्ट्रवादीच्या चिंतन.शिबिरातील पत्रिकेतून अजित पवारांचे नाव वगळण्यात आले आहे.
उद्या घाटकोपरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत विभागीय कार्यकर्ता शिबीर होणार आहे. पण या शिबीराच्या कार्यक्रमाच्या प्रसिद्धीपत्रकात अजित पवार यांचं नाव नाहीये. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. अजित पवारांचे प्रसिद्धीपत्रकात नाव नसल्यामुळे ते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार का? असा सवाल सध्या उपस्थित केला जात आहे. या कार्यक्रमाच्या प्रसिद्धी पत्रकात खासदार प्रफुल्ल पटेल, माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यासह इतरही नेत्यांची नावं आहेत. परंतु यात अजित पवारांचे नाव मात्र वगळण्यात आले आहे. अजित पवार यांचे नाव का वगळण्यात आले, याचे कारण गुलदस्त्यातच आले आहे. तीन दिवसापूर्वी पुरंदर येथे राष्ट्रवादी काँग्रेसकडून शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होते. अजित पवार हेही या कार्यक्रमास उपस्थित राहणार होते. पण त्यांनी आपला दौरा अचानक रद्द केल्याने ते कुठे गेले यांच्या चर्चा रंगल्या होत्या.
काही पुर्वनियोजित कार्यक्रम असल्याने अजित पवार घाटकोपरच्या शिबिराला उपस्थित राहणार नसल्याने, त्यांचं या शिबिराच्या प्रसिद्धी पत्रकातून नाव वगळण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार अजित पवार यांचा उद्या पिंपरी चिंचवडमध्ये कार्यक्रम आहे. पण या प्रकारामुळे राजकारणात पुन्हा एकदा जोरदार चर्चा होत आहे.