
मुंबई दि १३ (प्रतिनिधी)- महाराष्ट्राप्रमाणे केंद्र सरकारमध्येही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला सत्तेचा वाटा मिळणार आहे. केंद्र सरकारमध्ये शिंदे गटाला देखील एक कॅबिनेट आणि राज्यमंत्रिपद किंवा राष्ट्रीय कमिटीचे अध्यक्षपद दिलं जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय कॅबिनेट मंत्रीपदासाठी बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांचे नाव चर्चेत आहे. त्यामुळे केंद्रातूनही एकनाथ शिंदे यांना ताकत दिली जाणार आहे. ही उद्धव ठाकरे यांच्यासाठी डोकेदुखी ठरणार आहे.
खासदारांनी शिंदे गटाला पाठिंबा दिल्यानंतर केंद्रात शिंदे गटाला कोणते मंत्रिपद मिळणार अशी चर्चा सुरू होती. त्यानुसार केंद्रात शिंदे गटाला एक कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. आणि त्यासाठी प्रतापराव जाधव यांचे नाव आघाडीवर आहे.नितिश कुमार यांनी भाजपाची साथ सोडल्याने हिवाळी अधिवेशनाच्या अगोदर एकनाथ शिंदे यांच्या गटाला केंद्रात एखादं मंत्रीपद मिळू शकतं असं सांगितलं जात आहे.
आगामी निवडणूका लक्षात घेऊन केंद्रातून देखील शिंदे गटाला ताकत देण्यात येत आहे. त्यानुसार आता केंद्रात मंत्रिपद मिळणार आहे. उद्धव ठाकरे यांच्यासमोर शिंदे यांची शिवसेना उभी करण्यासाठी ही खेळी खेळली जाणार आहे.