बार्शी दि २६ (प्रतिनिधी) – पोळा हा बैलाचा सण असला तरी यंदाच्या या सणात शेतकऱ्यांचा उत्साह जोमात होता. कारण गेली दोन वर्ष या सणावर कोरोनाचे सावट होते.पण यंदा कोणतेही निर्बंध नसल्याने पोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला आहे. अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात असला तरीही त्याने पोळ्याचा सण साजरा केला आहे.
काळाच्या ओघात शेतकऱ्यांचा यांत्रिकिकरणावर भर असला तरी त्यांनी परंपरा जोपासली आहे. बार्शी तालुक्यातही बैलपोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला आहे. बैलाला पोळ्याच्या आदल्या दिवशी खांदामळणी करत लग्नाचे निमंत्रण देण्यात येते. तर आज पारंपारिक पद्धतीने बैलाला सजवण्यात आले होते. गावातून मिरवणूक काढल्यानंतर लग्नाचा विधी संपन्न झाला. त्यानंतर पुरपोळीचा नैवद्य देत बैलाचे आभार व्यक्त केले. यावेळी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडुन वाहत होता. यावेळी लहानग्यानीही चिखलाचे बैल करत पोळा सण साजरा करण्यात आला आहे. आजच्या काळातही अनेक शेतकऱ्यांनी गोधन जोपासले आहे. सर्जा राजाचे बरेचसे काम आज ट्रॅक्टर करत असला तरीही शेतकऱ्यांनी बैलाशी नाते अजूनही जोपासले आहे.
नैसर्गिक संकटाने शेतकऱ्यांची पाठ ही सोडलेली नाही. खरीप हंगामातील पिकांचा पेरा होताच सुरु झालेले संकट अद्यापही कायम आहे. असे असले तरी शेतकऱ्यांनी या सर्व संकटाला बाजूला सारुन पोळा सण उत्साहात साजरा केला आहे. बैलजोडीच्या ऋणाईत हा सण साजरा केला जातो.