पिंपरी चिंचवड दि २६ (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. विवाहित पुरुषाला लग्न करण्यासाठी अविवाहित महिलेने तगादा लावल्याने, विवाहित पुरुषाने सुपारी देऊन त्या महिलेची हत्या केली. संगीता बाळासाहेब भोसले असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे. पोलीसांनी आरोपीला अटक केली आहे.

संगीता भोसले आणि व्यापारी बजरंग मुरलीधर तापडे यांचे मागील दोन वर्षापासून अनैतिक संबंध होते, पण संगीता भोसले यांनी तापडे याच्याकडे लग्न करण्यासाठी तगादा लावला होता. याचाच राग मनात तापडने त्याचा मित्र पांडुरंग हारके याच्या मार्फत संगीताच्या खुनाची सुपारी दिली होती. त्यातूनच तळेगाव दाभाडे परिसरात ९ ऑगस्टला सचिन थिगळे आणि सदानंद तुपकर यांनी संगीता भोसले हिची स्कुटी गाडी अडवून धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केली.थिगळे आणि तुपकरला हारकेने हत्येची सुपारी दिली होती.
पण पिंपरी चिंचवडच्या गुन्हे शाखा पथकाने तपास करून पांडुरंग हारके, सचिन थिगळे, सदानंद तुपकर आणि बजरंग तापडे या ४ आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत. या घटनेने पिंपरी चिंचवड परिसरात खळबळ उडाली आहे.