सरसकट मराठा आरक्षण मिळाल्यावरच उपोषण आंदोलन थांबेल
मनोज जरांगे पाटील यांचं राज्य सरकारला खुलं आव्हान, आजपासून पाणीही सोडणार, सरकार अडचणीत
जालना दि १(प्रतिनिधी)- मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देण्यासंदर्भात ठराव झाला आहे. तसेच मनोज जरांगे पाटील यांनी यांनी उपोषण सोडावे अशी मागणी करण्यात आली. दरम्यान, यावरून मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मनोज जरांगे पाटील अजूनही उपोषणावर ठाम आहेत. ते म्हणाले, आम्ही चर्चेला चार दिवसांपासून बोलवत आहोत, पण ते येत नाहीत. पण यांना काड्या घालायची सवय लागली आहे. त्यामुळे मराठ्यांमध्ये दम निघत नाही. मराठे तापट आहेत. तुम्हाला आरक्षणासाठी वेळ हवा असेल तर मला बोलता येतंय तोवर चर्चेसाठी या. तुम्हाला किती वेळ हवाय ते सांगा. देवेंद्र फडणवीसांनी चर्चेसाठी यावं, रस्त्यांवर तुम्हाला कोणीही अडवणार नाही. माझे मराठा तुम्हाला संरक्षण देतील. पण आज संध्याकाळपासून मी पाणीही सोडणार आहे, मग बघू मराठ्यांना कसं आरक्षण देत नाहीत, असा इशारा जरांगे पाटलांनी दिला. त्याचबरोबर सरकारनं अध्यादेश रद्द करावा. सरकारला वेळ द्यायचा की नाही हे सरकारशी बोलून ठरवू. मी चुकीच करणार नाही, मग तुम्ही योग्य करणार का? सरकारला वेळ दिला म्हणजे आरक्षण मिळणार का? गरिबांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. वेळ दिल्यावर सरसकट आरक्षण देण्यात येणार का? आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन थांबविणार नाही. वेळ कशासाठी पाहिजे ते सांगा, असे प्रश्न जरांगे यांनी उपस्थित केले आहेत. त्याचबरोबर आजच्या बैठकीतील तपशील पाहण्याची माझी इच्छा नाही. गोर गरिबांच्या पोरांना अन्याय सहन करावा लागत असातना हे नेते हसण्यावारी नेत आहेत. यांना जनता सांभाळणारं सरकार म्हणायचे का? असा सवाल जरांगे पाटील यांनी उपस्थित केला आहे. सरकारने मराठा समाजाचा अंत पाहू नये, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी केले आहे.
राज्य सरकारने इंटरनेट बंद केले आहे. राज्य सरकारने हे चाळे बंद करावेत. आम्ही मनात आनले तर यांचा आवाज पाच मिनिटांमध्ये बंद करु शकतो, असा इशाराही जरांगे यांनी या वेळी राज्य सरकारला दिला. राज्य सरकारने मराठा समाजाला पूर्ण आरक्षण द्यावे. सुरु झालेले हे आंदोलन समाजाला आरक्षण मिळवूनच थांबेल असेही मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.