Latest Marathi News
Ganesh J GIF

तिसऱ्या लग्नाला विरोध केल्याने पतीने केला दुसऱ्या पत्नीचा खून

पत्नी हरवल्याचा बनाव, सीसीटीव्ही फुटेजमुळे पतीचा कारनामा उघड, दोन लग्न झालेली असूनही तिसऱ्याच्या तयारीला विरोध केल्याने खून

अहमदनगर दि १९(प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमसंबंधासह तिसऱ्या लग्नाला विरोध करत असल्याच्या रागातून पतीने आपल्या दुसऱया पत्नीचा खून केला आहे. ही घटना अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यामधील पारगाव सुद्रिक येथे घडली आहे.

पत्नीच्या हत्येनंतर पती फरार झाला आहे. ज्ञानदेव पोपट आमटे असे फरार पतीचे नाव आहे. रूपाली ज्ञानदेव आमटे असे मृत पत्नीचे नाव असून, याप्रकरणी रुपालीचा भाऊ रोहिदास संतोष मडके यांनी फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पती ज्ञानदेव आमटे याचे एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याची माहिती त्याची पत्नी रूपाली आमटे हिला मिळाली होती. हा प्रकार माहीत होताच तिने याबाबत पतीला विचारणा केली. याचा राग आल्याने ज्ञानदेवने पत्नीच्या खुनाचा कट रचला. यासाठी त्याने घराच्या डाव्या बाजूला मोठा खड्डा तयार केला. तसेच आपल्या मुलांना बहिणीकडे पाठवून दिले. तेथून माघारी येऊन त्याने पत्नीचा खून केला. पुरावा नाहीसा करण्याच्या उद्देशाने त्याने पत्नीचा मृतदेह कापडामध्ये बांधून घराच्या बाजूला आगोदरच खोदलेल्या खड्ड्यात पुरून टाकला. तसेच तिच्या माहेरी फोन करून रुपाली श्रीगोंदाहून परत आली नसल्याचे सांगितले. तसेच त्यानंतर कोणाला संशय येऊ नये, यासाठी पत्नी हरविल्याची तक्रार श्रीगेंदा पोलीस ठाण्यात दिली होती. तसेच, पत्नीच्या भावाला सोबत घेऊन परिसरात शोधही घेतला. अखेर ती मिळून न आल्याने तिच्या भावाला पतीवरच संशय आला. तिच्या भावाने परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. तसेच रोहितच्या घराच्या आजूबाजूच्या लोकांना तेथे मोठय़ा प्रमाणावर दुर्गंधी येऊ लागल्याने त्यांनी पोलीसाना कळवले. यानंतर पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले व पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग तसेच नायब तहसीलदार खोमणे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यानंतर खड्डा खणला असता, रुपाली हिचे प्रेत आढळून आले. दरम्यान गुन्हा दाखल होत असल्याचे समजताच आरोपीने मोबाइल बंद करून पलायन केले. पोलीसांनी आरोपीच्या शोधार्थ पथके पाठविण्याची माहिती पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांनी दिली आहे.

ज्ञानदेव आमटे याचे पहिल्या पत्नीशी वाद सुरू असून, श्रीगोंदा न्यायालयात खटला चालू आहे. या दरम्यान आमटे याने रुपाली हिच्याशी दुसरा विवाह केला. ज्ञानदेव आमटे याचे गावातील एका मुलीसोबत प्रेमप्रकरण सुरू असल्याची माहिती रुपालीला समजली होती. पण तिने याला विरोध केला होता. त्यामुळे दोघांच्यात सतत वाद होत होते.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!