पुण्यात नूतन मराठी विद्यालयातील नववीच्या विद्यार्थ्याला शिक्षिकेने बेदम मारहाण केल्याची घटना घडलीय. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून पालकांनी संताप व्यक्त केला आहे.विद्यार्थ्याला लाथा बुक्क्यांनी मारहाण करत असल्याचा शिक्षिकेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर विद्यार्थ्याच्या पालकांनी या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली. पूजा केदारी असं शिक्षिकेचं नाव असून बडतर्फीची कारवाई करावी अशी मागणी पालकांनी केली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, शिक्षिका जेव्हा वर्गात शिकवण्यासाठी आल्या तेव्हा मुले एकत्र बोलत बसले होते. शिक्षिका येताच ती मुले पुन्हा जागेवर गेली. मुले जागेवर गेल्याचं पाहून शिक्षिकेनं एका विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली. त्याचे दोन्ही हात पिरगळले आणि कचऱ्याच्या डब्यात तोंड घालून त्याला मारल्याचा आरोप विद्यार्थ्याच्या कुटुंबियांनी केला आहे.
मुलाला मारहाण झाल्यानंतर शिक्षिकेने त्याला धमकीसुद्धा दिली. कोणाला सांगायचे त्याला सांग असा दम शिक्षिकेने दिला. 7 मार्च रोजी दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली. मात्र वार्षिक परीक्षा जवळ असून नापास करतील या भितीने विद्यार्थ्याने याबाबत कुणालाही सांगितलं नाही. पण व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
पोलिसात तक्रार दाखल केली असून या प्रकरणी पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. विद्यार्थ्याला झालेली मारहाण गंभीर असून या प्रकरणी श्रीमती पूजा सुनिल केदारी यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी शिक्षण संस्थेकडे केली आहे.