सातारा : कराड तालुक्यातील वहागाव या ठिकाणी काही लोकांना जत्रेचे जेवण महागात पडले आहे. यामध्ये मांसाहारी जेवणातून २३ जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
विषबाधा झालेल्यांपैकी तुकाराम विठ्ठल राऊत (रा. वहागाव, ता. कराड) यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर त्यांची पत्नी सुनंदा तुकाराम राऊत व सचिन वसंत सोनुलकर यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
काय घडले नेमके?
वहागाव येथील तुकाराम विठ्ठल राऊत यांच्या नातेवाईकाची शुक्रवारी दोन जून रोजी देवाची यात्रा होती. या यात्रेला मासांहारी जेवण होते. त्यानिमित्ताने त्यांनी येतगाव (ता. कडेगाव), गोळेश्वर, अभयनगर, विंग तसेच स्थानिक वहागावमधील ३५ पै- पाहुणे व नातेवाईकांना जेवणासाठी निमंत्रित केले होते. शुक्रवारी मांसाहारी जेवण झाल्यानंतर शनिवारपासून ३५ जणांपैकी तुकाराम राऊत यांच्या कुटुंबीयांसह २३ जणांना उलट्या व जुलाबाचा त्रास होऊ लागला. या २३ जणांमध्ये वहागावमधील ११ , येतगाव ४ , गोळेश्वर २ , अभयनगर ३ व विंग येथील ३ जणांचा समावेश आहे.
वहागाव येथील वसंत अण्णा सोनुलकर, गणेश बाळासाहेब पवार, मनोहर जयवंत पवार, भामा वसंत सोनवलकर, लक्ष्मण ज्ञानदेव राऊत, अनिकेत लक्ष्मण राऊत, अण्णा लक्ष्मण सरगर, लक्ष्मण विष्णू सरगर व जयेश सदाशिव पवार यांना वहागाव आरोग्यवर्धिनी उपकेंद्रात उपचाराकरता दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, तुकाराम राऊत यांच्यावर कराड येथे उपचार सुरू असतानाच रविवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाला. पत्नी सुनंदा तुकाराम राऊत व सचिन वसंत सोनुलकर यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.