पुण्यात माजी उपमहापाैराच्या मुलाची तरुणाला बेदम मारहाण
मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल, पोलीसांवरही आरोप, उपमहापाैरांच्या मुलाचा हा दावा
पुणे – पुण्याचे माजी उपमहापौर आबा बागुल यांच्या मुलाने दुचाकी चालकाला मारहाणकेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले आहे.
ट्रॅफिकमधून दुचाकी चालवत असताना कारला धक्का लागला, या कारणातून आबा बागूल यांचा मुलगा हेमंत बागूल याने दुचाकीस्वार तरुणाला मारहाण केली आहे. हेमंत बागूल याच्याकडून तरुणाला मारहाण होतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये असे दिसून येत आहे की, लाल रंगाच्या कारचा दरवाजा उघडल्याने संबंधित तरुणाचा धक्का बागूल याच्या कारला बसला. यानंतर घटनास्थळी बाचाबाची झाल्याचं दिसून आलं. हेमंत बागूल याने कारमधून खाली उतरत तरुणाला कानशिलात लगावली. यानंतर भररस्त्यात तरुणाची कॉलर पकडून मारहाण केली. पुण्यातील मंगळवार पेठ परिसरात ही घटना घडली आहे. याप्रकरणी तरुणाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. यानंतर हेमंत बागूल यानेही तक्रारदार तरुणाविरोधात तक्रार दाखल केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही घटना २१ जानेवारीला घडली आहे. पण तक्रारदार तरुणाची पोलिसांकडून तक्रार दाखल करून घेतली जात नव्हती, असा आरोप पीडित तरुणाने केला आहे. आबा बागुल यांच्या राजकीय दबावामुळे गुन्हा दाखल होत नाही, असं तक्रारदाराचं म्हणणं आहे. आबा बागुल यांचे सुपुत्र हेमंत बागुल यांनी आपल्याला मारहाण करत ‘पोलीस स्टेशनला पोहोचण्याआधीच गोळी तुझ्यापर्यंत पोहोचेल, आणि तुझ्या घरच्यांनाही बॉडी सापडणार नाही.’ धमकी दिली, अशी तक्रार फय्याज सय्यद यांनी बंडगार्डन पोलिसांकडे दिली आहे.
हेमंत बागुल यांनी खुलासा केला आहे. ‘माझे वाहन सिग्नल लागल्याने थांबलेले असताना वाहतूक नियमांचे उल्लंघन करून डाव्या बाजूने ओव्हरटेक करून त्या व्यक्तीने माझ्या वाहनाला पाठीमागून धडक दिली. त्यातून त्याला जाब विचारला असता, त्याने अरेरावी केली. त्याने दादागिरी करुन शिवीगाळही केली. त्यातून हा प्रकार घडल्याचा दावा केला आहे.