
पोरांनो अभ्यासाला लागा परीक्षेचे वेळापत्रक आले
राज्य मंडळाकडून दहावी बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
पुणे दि १९ (प्रतिनिधी)- दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे पुढच्या वर्षी म्हणजेच फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे यंदा आॅनलाईनच्या भरवश्यावर विद्यार्थ्यांना न बसता अभ्यास करावा लागणार आहे.
मंडळाने जाहीर केलेल्या संभाव्य तारखेनुसार बारावीची परिक्षा २१ फेब्रुवारीला, तर दहावीची परीक्षा २ मार्चला सुरू होणार आहेत, अशी माहिती सचिव अनुराधा ओक यांनी दिली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे आपल्या www.mahahsscboard.in या अधिकृत वेबसाईटवर हे वेळापत्रक जाहीर केले आहे. गेली तीन वर्ष कोरोनामुळे मंडळाचे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. एकदा तर परिक्षाच रद्द कराव्या लागल्या होत्या. तर यावर्षी शाळेतच परीक्षा घेण्यात आल्या होत्या. पण मंडळांने परिक्षा आॅनलाईन घ्याव्यात म्हणून विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. यंदा तशी परिस्थिती होऊ नये म्हणून मंडळाने सहा महिने आधीच तारखा जाहीर केल्या आहेत.
जाहिर केलेल्या वेळापत्रकाबाबत काही सूचना, हरकती असल्यास त्या विभागीय मंडळाकडे तसेच राज्य मंडळाकडे १५ दिवसाच्या आत लेखी स्वरूपात पाठवाव्यात, असेही राज्य मंडळातर्फे सांगण्यात आले आहे. त्यामुळे ताणतणाव न घेता विद्यार्थ्यांनी अभ्यासाला लागण्याची गरज आहे. बेस्ट आॅफ लक!