
भोंदूगिरीचा भयानक चेहरा!; स्मशानभूमीत नेऊन चिमुरडीवर अत्याचार
राज्यात महिला आणि मुलींवरील अत्याचाराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नसून, आता पालघरच्या डहाणू तालुक्यातून माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. अघोरी पूजेच्या बहाण्याने एका ५५ वर्षीय भोंदूबाबाने १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर स्मशानभूमीत लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून, पोलिसांनी नराधमाला बेड्या ठोकल्या आहेत.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या मोठ्या बहिणीला आरोग्याची समस्या होती. तिला होणारा रक्तस्त्राव थांबत नसल्याने कुटुंबाने या भोंदूबाबाकडे धाव घेतली होती. याचाच फायदा घेत या नराधमाने अघोरी पूजा आणि औषध देण्याचे आमिष दाखवून कुटुंबाचा विश्वास संपादन केला. मध्यरात्री १२ च्या सुमारास निर्जन अशा स्मशानभूमीजवळ या भोंदूबाबाने पूजेचे आयोजन केले होते. या पूजेच्या नावाखाली त्याने १३ वर्षांच्या चिमुकलीवर पाशवी अत्याचार केले.

पोलिसांची झटपट कारवाई
घटनेचे गांभीर्य ओळखून पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी तातडीने तपासाचे आदेश दिले. कासा पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे अवघ्या दोन तासांच्या आत ५५ वर्षीय आरोपीच्या मुसक्या आवळल्या. आरोपीवर पोक्सो कायद्यासह भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीची प्रकृती पाहता तिच्यावर सध्या कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
राजकीय आणि सामाजिक स्तरावर संताप
या घटनेमुळे पालघर जिल्ह्यात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. शिवसेना (शिंदे गट) तालुकाध्यक्षा वैभवी सबनीस यांनी या प्रकरणाचा कडाडून निषेध केला आहे. “भोंदूगिरीच्या नावाखाली निष्पापांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या अशा सैतानांना समाजात जागा नाही. अशा नराधमांवर फाशीचीच कारवाई व्हायला हवी,” अशी मागणी त्यांनी केली आहे.कोणत्याही आजारासाठी अघोरी पूजा किंवा भोंदूबाबांच्या नादी न लागता तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आपली जागरूकता अशा नराधमांना रोखू शकते.

