मुंबई दि ११ (प्रतिनिधी)- राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्या अधिवेशनाचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ ते २५ ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
विधिमंडळ कामकाज समितीने आजच्या बैठकीत अधिवेशनाचा कालावधी निश्चित केला. त्यामुळे नव्या मंत्र्यांचे खातेवाटप आज जाहीर होणे अपेक्षित आहे. म्हणजे शनिवारपासून ते आपल्या खात्याचा कारभार सांभाळतील. चार दिवस सुट्ट्या असल्यामुळे मंत्र्यांना उद्यापर्यंत आपापल्या खात्यांचा कारभार हाती घ्यावा लागेल. त्यानंतरच ते अधिवेशनात खात्यासंबंधी बोलू शकतात. विधानसभा कामकाज सल्लागार समितीत ठाकरे गटातील एकाही आमदाराचा समावेश नाही. त्यामुळे या निर्णयावर राष्ट्रवादी, काँग्रेस पक्षातील आमदारांनी नाराजी व्यक्त केली. या अधिवेशनात अतिवृष्टी त्याला जाहीर झालेली मदत वादग्रस्त मंत्र्यांचा समावेश या मुद्द्यावर हे अधिवेशन वादळी होण्याची शक्यता आहे.
राज्यात ३० जून रोजी शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले आहे. त्यांनी विधानसभेत बहुमतही सिद्ध केले.त्यानंतर तब्बल दीड महिन्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. भाजप आणि शिंदे गटातील एकून १८ नव्या मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यांचाही या अधिवेशनात कस लागणार आहे.