पुणे दि १३(प्रतिनिधी)- राज्यपाल भगतसिंग कोशैयारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर पुण्यातील विविध संघटनांनी आणि पक्षांनी मिळून आज पुणे बंदची हाक दिली आहे. पुण्यातील व्यापारी त्याचप्रमाणे रिक्षा चालक, हमालपंचायत, शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी संघटना आदींनी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पण या बंद दरम्यान एका महिलेचा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला आहे.
राज्यपालांच्या निषेधार्थ सर्व बाजारपेठा, दुकानं, कंपन्या वगैरे बंद ठेवण्यात आले होते. जी दुकानं सुरू होती त्यांना विरोधी पक्षांचे कार्यकर्ते बंद करण्यास सांगत होते. असेच एक दुकान सुरू असताना काही कार्यकर्ते तिथे पोहोचले आणि दुकान बंद करण्यास सांगू लागले. पण त्या महिलेनं मात्र दुकान बंद ठेवणार नकार दिला. ती महिला तेवढ्यावरच थांबली नाही तर एक तरी महाराजांचा गुण घ्या, महाराज अशी दादागीरी करत नव्हते असा सल्ला ती कार्यकर्त्यांना देऊ लागली. या महिलेचा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे. पवन नावाच्या ट्विटर अकाउंटवरुन तो शेअर करण्यात आला आहे. काहींनी या महिलेचे काैतुक केले आहे तर काहींनी थोडा वेळ दुकान बंद ठेवायला काय हरकत होती असा प्रश्न उपस्थित केला आहे.
पुणे!
दुकान बंद करण्यासाठी आलेल्यांना महिला दुकानदाराने नकार देत आपले दुकान सुरू ठेवले.pic.twitter.com/58J7ocOKC0
— पवन/Pawan 🇮🇳 (@ThePawanUpdates) December 13, 2022
दरम्यान या बंदमध्ये सर्वपक्षीय नेते आणि विविध संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त करण्यात आला होता. सुमारे साडे सात हजार पोलीस मूक मोर्चाच्या मार्गावर तैनात करण्यात आले होते. तर बंदला पाठिंबा देत स्थानिक व्यापारी संघटना दुपारी ३ वाजेपर्यंत दुकाने बंद ठेवली होती.