
बुलढाणा दि २१(प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह विधानानंतर राज्यभरातून टिका केली जात आहे. सर्वपक्षीय टिका होत असताना भाजप आणि शिंदे गट मात्र शांत होता पण आता शिंदे गटातील बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी सुद्धा राज्यपालांवर शाब्दिक हल्ला चढवला आहे. त्या सोबत त्यांनी भाजपालाही इशारा दिला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा वारंवार अपमान होत असेल तर हे चांगलं नाही. अन्यथा एक दिवस दोन्ही पक्षात वितुष्ट निर्माण होईल आणि त्याचे परिणाम दोघानांही भोगावे लागतील, असा इशारा देताना महान व्यक्तीबद्दल त्याच राज्याच्या राज्यपालांनी एकेरी उल्लेख करणं कितपत योग्य आहे, असा सवाल उपस्थित केला आहे यावेळी गायकवाड यांनी भाजप प्रवक्ते सुधांशु द्विवेदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे.भाजपच्या लोकांनी विचार करुन छत्रपतींच्या बाबतीत बोललं पाहिजे. अशाप्रकारचा अपमान आम्ही सहन करणार नाही. असे सांगत हे प्रकार असेच होत राहिल्यास युती तुटेल असा इशाराही दिला आहे. त्यामुळे शिवरायांच्या वादग्रस्त विधानावरुन भाजप एकाकी पडली आहे. पण यामुळे भाजप आणि शिंदे गटात सर्व काही आलबेल नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
संजय गायकवाड यांनी यावेळी राज्यपाल हकालपट्टीची मागणी करताना ज्या राज्यपालांना राज्याचा इतिहास माहिती नाही, अशा राज्यपालांना कुठे नेऊन घालायचे तिथे पाठवा’ असा हल्ला चढवला आहे. संजय गायकवाड यांच्या भूमिकेचे खासदार सुप्रिया सुळे यांनी काैतुक केले आहे. तर शिंदे गटात दुफळी असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.