‘…तर तुमच्या राजकीय जीवनाची जळून राख रांगोळी होईल’
शिवसेनेच्या 'या' नेत्याचा फडणवीसांसह एकनाथ शिंदेना इशारा
मुंबई दि २९ (प्रतिनिधी) – शिवसेना आणि शिंदे गटातील वाद संपण्याचे नाव घेत नाही. वारंवार दोन्ही बाजूंनी एकमेकांना डिवचण्याबरोबरच इशारेही देण्यात येत असतात. आता भास्कर जाधव यांनी शिंदे गटाला गर्भित इशारा दिला आहे. त्यामुळे राजकीय सामना होण्याची शक्यता आहे.
भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांना इशारा देताना भास्कर जाधव म्हणाले की, शिवसेना पक्ष म्हणजे निखारा आहे. या निखाऱ्यात कुणी हात टाकण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या राजकीय जीवनाची राख होईल, शिवसेना अंगार आहे, आगीशी कुणी खेळणार असेल तर खेळणाऱ्याची राजकीय कारकीर्द जळून खाक होईल, आम्हाला विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणणाऱ्या फडणवीस यांच्या पक्षाने आजवर अनेकांशी युती केली आणि दगा दिला. शिवसेना मात्र, एकासोबतच कायम राहिली, असे म्हणत फडणवीसांना प्रत्युत्तर दिले आहे. त्याचबरोबर केसाने गळा कापण्याचे काम भाजपने केले. संभाजी ब्रिगेडप्रमाणे महाराष्ट्रातील इतर पक्षांसोबत शिवसेनेने युती करायला करायला पाहिजे असेही जाधव म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्यावर भाजपा किंवा शिंदे गटाकडून प्रत्युत्तर दिले जाण्याची शक्यता आहे.
विधानसभेत आक्रमकपणे शिवसेनेची बाजू लावून धरणाऱ्या भास्कर जाधव यांना उद्धव ठाकरेंनी प्रमोशन दिलं आहे. नेतेपदी निवड झाल्यानंतर भास्कर जाधव यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शिंदे गट आणि भाजपवर जोरदार टीका केली. आक्रमक असलेले भास्कर जाधव नेतेपद मिळाल्यानंतर आणखी आक्रमक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.