
ठाकरेंचे हे चार खासदार लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार?
शिंदे यांचे 'ऑपरेशन टायगर' यशस्वी, हे दोन खासदार लवकरच गळाला लागणार?, ठाकरेंना धक्का?
दिल्ली – महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जोरदात हालचाली होत आहेत. ठाकरेंचे खासदार फोडण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ‘ऑपरेशन टायगर’ सुरु केले आहे. आता हे ऑपरेशन यशस्वी होण्याची शक्यता आहे. कारण ठाकरेंचे चार खासदार शिंदेंच्या गळाला लागले आहेत. हा ठाकरेंसाठी मोठा धक्का असण्याची शक्यता आहे.
बुधवारी दिल्लीत शिंदे गटाचे खासदार आणि केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला ठाकरे गटाच्या चार खासदारांनी हजेरी लावल्याने पक्षात खळबळ उडाली आहे. या स्नेहभोजनाला परभणीचे खासदार संजय जाधव, हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर, ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील आणि शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी हजेरी लावली. ईशान्य मुंबईतील शिवसेनेचे (यूबीटी) खासदार संजय दिना पाटील हे एकनाथ शिंदे यांचे खासदार पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या घरी गेले होते. इतकंच नाही तर संजय दिना पाटीलही एकनाथ शिंदेंच्या सत्कार समारंभाला उपस्थित होते. तसेच संजय पाटील हे ठाकरे गटाच्या खासदार बैठकीलाही उपस्थित नव्हते, त्यामुळे ठाकरे गटाचे हे चार खासदार लवकरच शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे लोकसभेत ९ खासदार आहेत. त्यापैकी सहा खासदारांनी पक्ष बदलला तर त्यांच्यावर पक्षांतर विरोधी कायद्यांतर्गत कारवाई करता येणार नाही. पण सध्या फक्त चारच खासदार शिंदे गटात जाण्याची शक्यता आहे. खासदार अनिल देसाई, अरविंद सावंत आणि ओमराजे निंबाळकर हे ठाकरेंचे तीन खासदार ठाकरेंची साथ कधीच सोडणार नसल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे राजाभाऊ वाजे आणि संजय देशमुख यांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरु आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ‘ऑपरेशन टायगर’ उद्धव गटाला खरोखरच मोठा धक्का देणार का, की केवळ राजकीय स्टंटबाजी आहे, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
मंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडून आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला गेल्याबद्दल ठाकरेंचे खासदार संजय जाधव यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, ‘तुम्हाला कोणी जेवायला बोलावले, तर तुम्ही जात नाही का, अशी प्रतिक्रिया दिली. तर ऑपरेशन टायगर विषयी विचारले असता ते म्हणाले ऑपरेशन टायगर फेल आहे, असेही ते म्हणाले आहेत.