पुण्यातील भाजपाचे हे तीन आमदार पराभवाच्या छायेत?
महाविकास आघाडीची एकी भाजपासाठी चिंतेची,'कसबा पॅटर्न' मुळे निवडूकीत ट्विस्ट
पुणे दि ११(प्रतिनिधी) – कसबा पोटनिवडणूकीत भाजपाचा तीस वर्षाचा बालेकिल्ला ताब्यात घेतलेल्या महाविकास आघाडीचा आत्मविश्वास कमालीचा वाढला आहे. महाविकास आघाडीच्या रवींद्र धंगेकर यांनी भाजपच्या हेमंत रासने यांचा पराभव केला. पण महाविकास आघाडीने एकी दाखवल्यस भाजपाला पुण्यातील तीन जागांवर पराभव होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भाजपाने २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये पुण्यातील तीन जागा अवघ्या पाच हजार मतांच्या फरकाने जिंकल्या होत्या. पुण्यातील शिवाजीनगर, पुणे कॅन्टोन्मेंट आणि खडकवासला या तीन मतदारसंघात भाजपाने निसटता विजय मिळवला होता. सध्या पुण्यातील खडकवासला विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार भीमराव तापकीर, शिवाजीनगर मतदारसंघाचे सिद्धार्थ शिरोळे आणि पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे सुनील कांबळे आहेत. पण या ठिकाणी महाविकास आघाडीला विजयाची आस आहे. खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत भीमराव तापकिरांना १ लाख २० हजार ५१८ मते मिळाली होती. तर राष्ट्रवादीच्या सचिन दोडके यांना १ लाख १७ हजार ९२३ इतकी मते मिळाली होती. तापकीर यांना अवघ्या २ हजार ५९५ मतांनी निसटता विजय मिळाला होता. तर शिवाजीनगर मतदारसंघात सिद्धार्थ शिरोळे यांना ५८ हजार ७२७ इतकी मते मिळाली होती. तर काँग्रेसचे दत्ता बहिरट यांना ५३ हजार ६०३ इतकी मते मिळाली होती. शिरोळे यांनी बहिरट यांचा ४ हजार १२४ मतांनी पराभव केला होता. तर पुणे कॅन्टोन्मेंट मतदार संघात भाजपचे सुनील कांबळे यांनी काँग्रेसच्या रमेश बागवे यांचा पराभव केला होता. या निवडणुकीत कांबळे यांना ५२ हजार १६० इतकी मत मिळाली होती. तर काँग्रेसचे रमेश बागवे यांना ४७ हजार १४८ मते मिळाली होती. बागवे ६ हजार १४२ मतांनी पराभूत झाले होते. महाविकास आघाडीची एकी झाल्यास तीन जागांचा भाजपाला फटका बसण्याची शक्यता आहे.
कसबातील निकालानंतर भाजपचे भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे आणि सुनील कांबळे हे तीनही आमदार डेंजर झोनमध्ये आहेत असे राजकीय जाणकार सांगत आहेत. त्याशिवाय हडपसर, वडगाव शेरी या जागेवर राष्ट्रवादीने निसटता विजय मिळवला होता. पण आता महाविकास आघाडीची साथ लाभल्याने त्या जागा राष्ट्रवादीसाठी सोप्या झाल्या आहेत.