मुंबई दि १९ (प्रतिनिधी)- मुंबईत बोरिवली पश्चिमेकडील साई बाबानगरमध्ये गीतांजली नावाची चार मजली इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पत्याच्या बंगल्याप्रमाणे ही इमारत कोसळली आहे. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या गाड्या पोहोचल्या असून, बचावकार्य अजुनही सुरूच आहे.या दुर्घटनेमुळे जुन्या इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
अनेक वर्षे जुन्या या इमारतीत १२ ते १५ फ्लॅट होते अशी माहिती आहे. ही जुनी इमारत अचानक कोसळली. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली होती. . या इमारतीमध्ये काही कुटुंब राहत होते. त्यामुळे त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. अग्निशमन दलाचे ८ फायर इंजिन, २ रेस्क्यू व्हॅन,१ क्यूआरव्ही, १ कमांड पोस्ट वाहन आणि तीन रुग्णवाहिका यांच्या मदतीने बचाव कार्य सुरु होते.इमारत धोकादायक असल्याने रिकामी करण्यात आली होती. मात्र या कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्यात कोणी अडकले आहे का, याचा अग्निशमन दलाकडून शोध सुरू होता.
गीतांजली ही धोकादायक इमारत कोसळतानाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये सदर इमारत कोसळण्यापूर्वी संपूर्ण इमारत व इमारतीच्या खिडक्या, काचा हालत असल्याचे पाहताच इमारतीसमोरील रस्त्यावर बघ्यांची गर्दी जमली होती.