बाॅलीवूडमधील ही प्रसिद्ध अभिनेत्री आली ईडीच्या रडारावर
अभिनेत्रीला दुबईतील तो लग्न सोहळा पडला महागात, या प्रकरणी होणार कारवाई, काय आहे प्रकरण?
मुंबई दि २०(प्रतिनिधी)- एखाद्या लग्न सोहळ्यासाठी किंवा कार्यक्रमासाठी चित्रपटसृष्टीतील तारे तारखांना बोलावणे आजकाल सामान्य झाले आहे. कलाकार देखील यासाठी तगडे मानधन घेत असतात. पण याच कारणामुळे बाॅलीवूडमधील काही कलाकार अडचणीत आले आहेत. आॅनलाईन सट्टेबाजी अॅप्लिकेशनमध्ये कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या सौरभ चंद्राकर या ठगामुळे १७ बॉलिवूडकर ईडीच्या निशाण्यावर आले आहेत. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
नुकताच ऑनलाईन गेमिंग अॅप कंपनीच्या संस्थापकांपैकी एक सौरभ चंद्राकरच्या लग्नाचा भव्य सोहळा पार पडला. या लग्नात बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावत परफॉर्म केले. लग्नाचा थाटमाट असणारा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्याने आपल्या लग्नावर जवळपास २०० कोटी खर्च केल्याची माहिती आहे. ईडीने घोटाळ्याप्रकरणी कारवाई करत ४१७ कोटी रुपये जप्त केले आहेत. तसेच या लग्नसोहळ्याला हजेरी लावणाऱ्या कलाकारांची आता चाैकशी केली जाणार आहे. या सोहळ्याला टायगर श्रॉफ, सनी लियोनी, राहत फतेह अली खान, आतिफ अस्लम, अली अजगर, विशाल ददलानी, नेहा कक्कड, भारती सिंह, भाग्यश्री, एली अवराम, पुलकित, क्रिती खरबंदा,कृष्णाभिषेक आणि नुसरत भरुचा सहभागी झाले होते.ईडीने दिलेल्या माहितीनुसार, चंद्राकरने सप्टेंबर २०२२ मध्ये दुबईत एक पार्टी आयोजित केली होती. पार्टीसाठी ७ स्टार हॉटेलचं बुकिंग केलं होतं. त्यात सहभागी होण्यासाठी ४० कोटी रुपये दिले होते. त्यानंतर फेब्रुवारी २०२३ रोजी झालेल्या लग्नात सहभागी होणाऱ्या बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी नागपूर ते दुबई खासगी जेट भाड्याने घेण्यात आली होती. त्यातून बॉलिवूड सेलिब्रिटींसह, वेडिंग प्लॅनर, डेकोरेटर्स दुबईला आणण्यात आले होते. दरम्यान महादेव ऑनलाईन बेटींग ऍपच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असल्याचा ईडीला संशय होता. याप्रकरणी मनी लाँन्ड्रींगचा गुन्हा दाखल करत ईडीने चौकशी सुरु केली आहे.
महादेव बुक ॲप आणि सट्टेबाजीचं प्रकरण छत्तीसगडचं आहे. यामध्ये काही राजकारणी, पोलीस अधिकारी आणि राजकारण्यांशी संबंधित लोकांचा समावेश आहे. सट्टेबाजीचा ॲपचा टर्नओव्हर २० हजार कोटींच्या घरात आहे. छत्तीसगडच्या भिलाईमध्ये राहणारा सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल हे दोघे महादेव ऑनलाईन बुकचे मुख्य प्रमोटर असून ते दुबईतून सगळे व्यवहार पाहतात. त्यांचं मुख्य कार्यालय संयुक्त अरब अमिरातमध्ये आहे. यातून अनेकांची फसवणूक करण्यात आली आहे.