Latest Marathi News
Ganesh J GIF

…असे मिळाले होते शिवसेनेला धनुष्यबाण चिन्ह!

शिवसेनेच्या धनुष्यबाणाचा रंजक इतिहास, नवीन चिन्ह इतिहास घडवणार?

मुंबई दि ९(प्रतिनिधी) – निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला धक्का देत धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव तात्पुरते गोठवले आहे. त्यामुळे शिवसेना आणि धनुष्यबाण हे ३३ वर्ष जुने नाते आता संपुष्टात आले आहे. यामुळे मुळ शिवसैनिक दुखावला आहे. आता इथून पुढे ठाकरे आणि शिंदे गटाला नवीन नावाने निवडणूक लढवावी लागणार आहे. पण शिवसेनेला धनुष्यबाण कसे मिळाले होते याचा फारच रंजक इतिहास आहे.

शिवसेनेची स्थापना जून १९६६ मध्ये झाली. पण शिवसेनेने १९८८ साली रितसर पक्ष म्हणून निवडणूक आयोगाकडे नोंदणी केली. त्यापूर्वी शिवसेना वेगवेगळ्या चिन्हावर निवडणूक लढवत होती. अगदी शिवसेनेने रेल्वे इंजिन या चिन्हावर देखील निवडणूक लढवली आहे. शिवसेनेचे १९८८ सालाच्या आधी नगरसेवक, आमदार निवडून आले होते. पण त्यांची नोंद अपक्ष अशी व्हायची, छगन भुजबळ हे शिवसेनेचे पहिले आमदार म्हणून ओळखले जातात, पण त्यांची विधिमंडळात अपक्ष अशीच नोंद होती.

बाळासाहेबांनी शिवसेनेचे चिन्ह म्हणून डरकाळी फोडणारा वाघ मागितला होता. पण १९६८ सालच्या निवडणूक चिन्ह कायद्यानुसार चिन्ह म्हणून पशू-पक्षी किंवा माणूस ही चिन्ह म्हणून वापरता येणार नव्हती. त्यावेळी शिवसेनेला धनुष्यबाण चिन्ह मिळाले होते त्यावेळी शिवसेनेचे मुंबईत ४२ नगरसेवक निवडून आले होते. तर १९७० साली कम्युनिस्ट आमदार कॉ. कृष्णा देसाई यांच्या हत्येनंतर पोटनिवडणूक लागली होती. त्या पोटनिवडणुकीत शिवसेनेकडून वामनराव महाडिक यांना उमेदवारी दिली. ती निवडणूक शिवसेनेने जिंकली. त्यावेळी शिवसेनेचे चिन्ह उगवता सूर्य असे होते.१९७८ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी शिवसेनाला आयोगाकडून रेल्वे इंजिन हे चिन्ह देण्यात आलं होते. पण जनता पक्षाच्या लाटेत शिवसेनेच्या रेल्वे इंजिनाची धूळधाण उडाली. अगदी आता मनसेनेही सततच्या पराभवामुळे रेल्वे इंजिनची दिशा बदललेली आहे.

संघटना अशी नोंद असलेल्या शिवसेनेची १९८८ मध्ये राजकीय पक्ष म्हणून नोंदणी झाली. स्वतःची घटनाही तयार केली. मात्र मतदानाची आवश्यक टक्केवारी नसल्यामुळे त्यांना चिन्ह मिळू शकलं नव्हते. पण १९८८ साली मिळालेल्या धनुष्यबाण चिन्हावर औरंगाबाद महापालिका निवडणुकीत चंद्रकांत खैरेंसह २८ नगरसेवक विजयी झाले होते. पुढे शिवसेनेने १९८९ साली भाजपाबरोबर युती करत लोकसभा निवडणूक लढवली. यावेळी प्रत्येकाला वेगवेगळी चिन्हे मिळाली त्यावेळी शिवसेनेचे परभणीचे उमेदवार अशोकराव देशमुख रिंगणात उतरले होते. त्यांना धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह मिळालं होते. देशमुखांसह शिवसेनेचे चार खासदार निवडून आले होते. आवश्यक मतांचा कोटा पूर्ण केल्याने शिवसेनेला मागणीप्रमाणे धनुष्यबाण मिळाले. त्याकाळी राम मंदिरासाठीच्या आंदोलनाचा काळ होता.त्यामुळे रामाचा आशिर्वाद म्हणत बाळासाहेबांनी धनुष्यबाण चिन्ह मिळवले होते.

शिवसेनेला १९८९ साली मिळालेले शिवसेना नावाचे चिन्ह गेली ३३ वर्ष प्रत्येक ठिकाणी झळकत होते. अनेक निवडणुका याच चिन्हावर शिवसेनेने लढवल्या. अगदी उद्धव ठाकरेंसहीत तीन मुख्यमंत्री याच चिन्हामुळे मिळाले. लोकसभेत देखील विक्रमी १८ खासदार याच चिन्हावर निवडून आले. पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे शिवसेना पक्षात फूट पडली. शिंदे गटाने देखील ४० आमदारासोबत वेगळे होत धनुष्यबाण चिन्हावर दावा केला. त्यामुळे निवडणूक आयोगाने तात्पुरते धनुष्यबाण चिन्ह गोठवले होते. त्यामुळे शिंदे गटाबरोबरच ठाकरे गटाला नवीन नाव आणि चिन्ह निवडावे लागणार आहे.पण शिवसैनिकांचा प्राण असलेला धनुष्यबाण मात्र निवडून आयोगाचा अंतिम निर्णय येईपर्यंत पाहता येणार नाही. त्यामुळे कट्टर शिवसैनिक मात्र दुखावला गेला आहे.

उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे अशी तीन नावे तर त्रिशुल, धगधगती मशाल आणि उगवता सूर्य ही चिन्ह निवडणूक आयोगाला पाठवली आहेत.त्यातील कोणत्या नावाला आणि चिन्हाला निवडणूक आयोग मान्यता देते त्यावर शिवसेनेचा पुढचा प्रवास असणार आहे. पण हा प्रवास खडतर असणार हे मात्र नक्की.

 

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!