
‘हे हडपसर गाव आहे इथे दुनियादारी नाही गुन्हेगारी चालते’
व्हिडिओ व्हायरल होताच पुणे पोलीसांनी दाखवला हिसका, रील बहाद्दर बादशाहाचा तोरा असा उतरवला
पुणे दि २२(प्रतिनिधी)- पुण्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कोयता गँग प्रकरणाने तर पुणे पोलीसांची चांगलीच दमछाक केली होती. पोलीसांनी काही उपाययोजना केल्या तरीही अपेक्षित यश मिळत असल्याचे चित्र नाही. त्यातही तथाकथित रील बनवण्याच्या नादात काहीजण अप्रत्यक्ष गुन्हेगारीकडे वळत आहेत. पण आता मात्र अशा एका रील बहाद्दराला पुणे पोलीसांनी चांगलाच हिसका दाखवला आहे.
हडपसर मधील एका तरुणाने सोशल मीडियावर एक रील्स बनला होता. त्या रिल्समध्ये ‘हे हडपसर गाव आहे, इथं दुनियादारी नाही गुन्हेगारी चालते…’ असे रील बनवून थेट पुणे पोलिसांनाच आव्हान दिले होते. तसेच तो व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. बादशाह नावाने हे रिल व्हायरल करण्यात आले होते. पण हे रील पुणे पोलीसांनी पाहिल्यानंतर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट सहाच्या पथकाने या तरुणाच्या मुसक्या आवळल्या आहेत. पवन संतोष भारती असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. पवन हा तरडेवाडी मोहम्मदवाडी येथे राहणारा आहे. सोशल मीडियावर त्याने गुन्हेगारीचे स्टेटस ठेवले होते. रील करणाऱ्या या तरुणाला पोलिसांनी एक अनोखी शक्कल लढवत शिक्षा सुनावली आहे. या तरुणाकडून एका व्हिडिओतूनच पोलिसांनी माफीनामा तयार करून घेतला आहे. पोलीसांनी त्याचा माफी मागतानाचा आधी आधीचा व्हिडिओ बिफोर आफ्टर इफेक्ट वापरत व्हायरल केला आहे. माफीच्या व्हिडिओत ‘मी गुन्हेगारीचा सोशल मीडियावर व्हिडीओ टाकला. त्याबद्दल मी सर्वांची माफी मागतो. असे पोलीसांनी त्याच्याकडून वदवून घेतले आहे. पवनचे पोलीस रेकॉर्ड आहे. त्याच्यावर यापूर्वीच ३ गुन्हे दाखल आहेत. दरम्यान ही कारवाई पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल व त्यांच्या पथकाने केली आहे.या गुन्हेगार बादशहावरील कारवाईने हडपसरवासियांनी समाधन व्यक्त केले. तसेच अशा आशयाचे व्हिडीओ करण्यास कोणी धजावणार नाही, अशी प्रतिक्रीया व्यक्त होत आहे.
सोशल मीडियावर रील बनवून फेमस होण्याचे प्रकार वाढले आहेत. याआधीही हातात शस्त्रे घेत रील बनवणाऱ्या तरूणांना पुणे पोलीसांनी कारवाईचा हिसका दाखवला होता. तरीही हे प्रमाण कमी होताना दिसत नाही. त्यामुळे पुण्यात तरुणांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून गुन्हेगारीचे उदातीकरण करण्यात येत असून ही चिंतेची बाब आहे. दरम्यान पवनवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.